
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या 45 दिवस आधी जाहीर करावे तसेच दरवर्षीप्रमाणे प्रत्येक पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी झाला.
आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या या वर्षीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 16 जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. वैद्यकीय परीक्षांबाबतची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मार्गदर्शक तत्वे तसेच सूचना आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ त्याचबरोबर या क्षेत्रातील तज्ञांची मते विचारात घेऊन राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने परीक्षा न घेण्याच्या मुद्दय़ावर प्रतिकूल प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या जिह्यातील परीक्षा केंद्रावर त्यांना परीक्षा देता येईल. विद्यार्थी, पालक यांच्यासमोरील अडचणी लक्षात घेऊन नियोजित परीक्षा पद्धती अधिक सोपी आणि सोयीची करण्याचा प्रयत्न अजूनही करण्यात येत आहे. तसेच अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षा याबाबत ठाम भूमिका घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.





























































