81 वर्षांची चलचित्राची परंपरा खंडित होणार, रंगारी बदकमध्ये यंदा चलचित्र नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील गणेशोत्सवात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या काळाचौकी येथील रंगारी बदक गणशोत्सव मंडळाने यंदा आपली 81 वर्षांची परंपरा मोडीत काढली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी समाज प्रबोधनाचे धडे देणाऱ्या चलचित्रांचा देखावा न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून मंडळाने यंदा अवघ्या 3 फुटांची गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. पुठे उंच मूर्ती तर पुठे समाजप्रबोधन करणारे आकर्षक देखावे ही मुंबईतील गणेशोत्सवाची ओळख. चलचित्राच्या माध्यमातून मुंबईच्या गणेशोत्सवाची ही ओळख गेल्या 81 वर्षे अवरितपणे सुरू ठेवण्याची ही परंपरा काळाचौकी येथील रंगारी बंदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ठेवली होती. दरवर्षी मंडळातर्फे अनेक सामाजिक विषयांवर चलचित्रांचे देखावे तयार केले जातात. हे देखावे पहायला मोठय़ा संख्येने गणेशभक्त याठिकाणी गर्दी करतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने साधेपणाने उत्सव साजरा करायचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाबद्दल बोलताना मंडळाचे विश्वस्त भाई मयेकर म्हणाले की, चलचित्रांच्या आकर्षणापोटी दरवर्षी गणेशभक्त या ठिकाणी येत असतात. यंदा ते आकर्षणच राहणार नाही. त्यामुळे गर्दी होणार नाही. सार्वजनिक आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.