
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर शरणागती पत्करली आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे. याबाबत प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जाब विचारण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.
चीनबाबतचे केंद्र सरकारचे धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ दिला जात नाही. याबाबत केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निणर्य काँग्रेस बैठकीत घेण्यात आला. प्रदेश अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर बुधवारी रात्री झालेल्या या बैठकीस माजी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अस्लम शेख, वर्षा गायकवाड, सुनील केदार आदी उपस्थित होते.
पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात 29 जूनला आंदोलन
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती निच्चांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही सलग 19 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढच केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी 29 जूनला केंद्र सरकारच्या विरोधात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 10 ते 12 या वेळत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार असल्याचे थोरात म्हणाले. त्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा 30 जून ते 4 जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करुन केला जाणार आहे.
26 जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस
या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, चीनने सीमेवर आगळीक करून आपले 20 जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला. तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. शहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी 26 जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळला जाणार आहे.






















































