चौथ्या दिवशी बीड जिल्ह्यात एक पॉझिटिव्ह आढळला, पाच जण कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. सलग चौथ्या दिवशी बीड जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी १९ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील १८ स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर केवळ एक जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयामध्ये उपचार घेत आहे.

शुक्रवारी सकाळी बीड जिल्ह्यातून एकुण १९ स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. बीडच्या सामान्य रूग्णालयातील ५, स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रूग्णालयातील १०, आष्टी ग्रामिण रूग्णालयातून १, माजलगाव ग्रामिण रूग्णालयातून २, केजच्या उपजिल्हा रूग्णालयातून १ असे एकुण १९ स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात १८ नागरिकांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. केवळ एक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो भूम तालुक्यातील गिरवली येथील असून सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात उपचार घेत आहे.

बीडचे एक रूग्णालय सील
बीड येथील विप्रनगरमधील एक महिला निमोनियाच्या आजाराने त्रस्त होती. तिचा कोरोनाचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्या महिलेवर बीडच्या एका खाजगी रूग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. प्रकृती गंभीर होत चालल्याने तिला संभाजीनगर येथील रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर बीड येथील उपचार घेतलेल्या एका खाजगी रूग्णालयाला  चोवीस तासासाठी सील करण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे. संपूर्ण रूग्णालय सॅनिटायझरिंग करण्याचे आदेश दिले गेले आहेत. तर महिलेच्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.

आज पाच जण कोरोनामुक्त
बीडच्या जिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले कोरोनाबाधितांपैकी पाच जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सायंकाळी घरी सोडण्यात आले. आता बीडच्या जिल्हा रूग्णालयात केवळ २१ कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत ११६ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील ९१ जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे तर चौघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.