‘आरटीई’अंतर्गत 5,371 विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिकेने ‘बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी 5 हजार 371 विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली आहे. पालिकेने खासगी विनाअनुदानित शाळांमधील 25 टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवले होते. यानुसार महापालिकेकडे एकूण 14 हजार 135 अर्ज आले. मुंबईतील 367 शाळांमधील 7 हजार 069 जागांसाठी हे अर्ज मागवण्यात आले होते.

‘बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009’ मधील कलम 12 (1) (सी) नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशासाठी 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षी प्रमाणे 2020–21 या वर्षासाठीही ‘आरटीई’अंतर्गत 25 टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले हाते. यानुसार महापालिकेकडे एकूण 14 हजार 135 अर्ज आले. या अर्जांची लॉटरी 17 मार्च 2020 रोजी काढण्यात आली आहे. यामध्ये एकूण 5 हजार 371 विद्यार्थी लॉटरी पद्धतीने निवडण्यात आले तर 3 हजार 421 विद्यार्थी प्रतिक्षा यादीत आहेत. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 4 हजार 53 विद्यार्थी हे एसएससी बोर्डाच्या शाळांकरिता तर इतर 1 हजार 318 विद्यार्थी अन्य बोर्डचे आहेत. या लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘मेसेज’ पाठवण्यात आले आहेत. मात्र, लॉकडाऊन असल्या कारणाने प्रवेश प्रक्रियेचे पुढील कामकाज होऊ शकले नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे. शैक्षणिक वर्ष 2020–2021 हे 15 जूनपासून सुरु झालेले आहे. सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी व संकलन करुन पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश दिले जाणार आहेत.

पालकांनो, हे करा!

1) शाळेचा प्रवेशाबाबतचा मेसेज आल्यानंतर त्या तारखेला सर्व मूळ आवश्यक कागदपत्रे व एक छायांकीत प्रत घेऊन शाळेत उपस्थित रहावे व कागदपत्रांच्या पडताळणीस अधीन राहुन तात्पुरता प्रवेश घ्यावा, तसेच हमीपत्र शाळेला द्यावे.

2) शाळेने दिलेल्या तारखेला उपस्थित राहता येणे शक्य नसल्यास, शाळेला तसे कळवण्यात यावे व पुढील तारखेची मागणी करावी.

3) शाळेच्या ‘मेसेज’वर अवलंबून न राहता ‘आरटीई’ पोर्टलवर बालकांचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या तारखेची खात्री करावी.