अंधेरी-विलेपार्ल्यातील 150 मंडळांचा साधेपणाने गणेशोत्सवाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा साधेपणाने आणि कमी उंचीची गणेशमूर्तीची स्थापना करून यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला अंधेरी-विलेपार्ले येथील जवळपास 150 हून अधिक मंडळांनी पाठिंबा दर्शविला आहे. शिवसेनेच्या वतीने परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्या सूचनेनुसार विलेपार्ले येथील सर्व सार्वजनिक मंडळांची विशेष बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला असून यावेळी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी सार्वजनिक मंडळांनी यंदा 3 ते 4 फूट उंचीची गणरायाची मूर्ती, वर्गणी न घेणे, आगमन आणि विसर्जन सोहळा रद्द करण्याबरोबर साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी दिली. या सभेचे प्रास्ताविक बाबा कुलकर्णी यांनी केले.