
कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईत मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुढे सरसावली आहेत. दरवर्षी मोठय़ा उत्साहात साजरा केला जाणारा हा उत्सव यंदा अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत, जवळपास सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लहान मूर्तींना प्राधान्य दिले आहे. इतकेच नव्हे तर, अनेक मंडळांनी या संकटासमयी सामाजिक उपक्रम राबवित राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून मूर्ती लहान पण कार्य महान, ही प्रचीती घडवून दिली आहे.
मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दरवर्षी मोठय़ा जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव यंदा साधेपणाने करण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सार्वजनिक मंडळांशी संवाद साधत मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर कमीत कमी उंचीची मूर्ती करण्याचे आवाहनदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जवळपास सर्वच मंडळांनी आपल्या गणरायाची मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर अनेक मंडळांनी आता विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित कोरोनाविरोधाच्या लढाईत सहभाग नोंदविला आहे. यात अनेक मंडळांनी आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. तर अनेक मंडळांनी सॅनिटायझर, मास्क आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करीत आपापल्या परीने या लढाईत खारीचा वाटा उचलला आहे. याशिवाय अनेक सार्वजनिक मंडळांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
काळाचौकीत साजरे होणार ‘आरोग्य वर्ष’
आपल्या पारंपरिक आगमन सोहळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील काळाचौकी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (काळाचौकीचा महागणपती) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदाचे वर्ष आरोग्य वर्ष म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आगमन सोहळा रद्द करीत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्याचबरोबर यंदा फक्त तीन फुटांच्या शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे नुकतेच जाहीर केले आहे.
मंडळाच्या या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना मंडळाचे प्रमुख कार्यवाह अमन दळवी म्हणाले की, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करुन आम्हांला कोणताही उत्सव साजरा करायचा नाही. त्यामुळेच यंदा आम्ही उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निश्चित केले असून मंडळाने यंदाचे वर्ष आरोग्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. काही दिवसांपूर्वीच स्थानिकांचे आरोग्य लक्षात घेता विभागात जंतुनाशक फवारणी केली होती. त्यानंतर भविष्यातदेखील स्थानिकांच्या आरोग्यासाठीच आम्ही सर्व कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे त्यांनी दै. ‘सामना’ला सांगितले.





























































