शेती विकायची नसते ती राखायची असते; लेखक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी केली भातलावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘शेती विकायची नसते ती राखायची असते’ असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. मुळशी तालुक्यातील जातेडे या त्यांच्या गावात नुकतेच त्यांनी कुटुंबीयांसमवेत भात लावणी केली. यावेळी त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर यांनीही हातभार लावला.

भात लावणी आणि वडील विठ्ठल तरडे यांच्या 78 व्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना प्रवीण तरडे म्हणाले की, सध्या लॉकडाऊनमुळे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत. यामुळे मी आपल्या कुटुंबीयांसोबत शेतात भात लावणी करायला आलो आहे. तसेच कोरोनामुळे यंदा वारी झाली नाही यामुळे आईवडील शेतात राबत आहेत, अन्यथा ते शेतातील काम आटोपून वारीला निघालेले असतात. पुण्या–मुंबईत कामासाठी गेलेल्या प्रत्येकाने आपल्या मातीशी असलेले नाते कायम जपावे असे सांगत आपलं शेत आपण कसले पाहिजे असंही ते म्हणाले. तसेच त्यांनी लॉकडाऊनच्या काळात शेतकरी ज्या पद्धतीने कष्ट करतो आहे त्याला यावेळी सलाम केला. मराठीतील भव्यदिव्य असा ऐतिहासिक ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.