जीएसबी मंडळाचे दर्शनासाठी यंदा विशेष ऍप, गर्दी टाळण्यासाठी मंडळाचा विशेष निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सोन्याचा गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱया किंग्ज सर्कल येथील जीएसबी मंडळाने यंदा गणपतीच्या दर्शनासाठी विशेष ऍपच्या निर्मितीचा निर्णय घेतला आहे. या ऍप्सच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतरच बाप्पाचे दर्शन घेता येणार असून राज्य सरकारच्या नियमावलीनंतर या ऍप्सची निर्मिती पूर्ण केली जाणार आहे. विशेष म्हणजे, भक्तांची सुरक्षा लक्षात घेता यंदा भक्तांना दर्शनाकरिता येताना नारळ, मोदक आणि फुले घेऊन न येण्याची सूचनादेखील करण्यात आली आहे.

मुंबईतील सोन्याचा गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱया किंग्ज सर्कल येथील जीएसबी मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनाकरिता दरवर्षी लाखो गणेशभक्त गर्दी करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भक्तांना प्रवेश देण्याकरिता मंडळाकडून तिरुपती बालाजीच्या धर्तीकर किशेष मोबाईल ऍप तयार करण्यात येणार आहे. याशिवाय गणेशभक्तांचे थर्मल क्रिनिंग आणि सॅनिटायझर केल्यानंतरच गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणर आहे.

याबद्दल बोलताना मंडळाचे सतीश नायक म्हणाले की, गणेशभक्तांची सुरक्षा लक्षात घेता आम्ही हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारची नियमावली आल्यानंतर याचे अंतिम स्वरुप निश्चित केले जाणार आहे. याबरोबरच उत्सव काळात ज्या पूजा आयोजित केल्या जातात, त्यादेखील यंदा ऑनलाईनरीत्या मोबाइलवर पाहता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदा मुखदर्शन नाही
दरवर्षी जीएसबीच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मोठय़ा संख्येने गणेशभक्त गर्दी करतात. त्यांना मुखदर्शनाच्या माध्यमातून दर्शन दिले जाते. पण यंदा हे मुखदर्शन बंद करण्यात येणार असल्याचे कळते.

वयोवृद्धांनाही दर्शन नाही
कोरोनाची धास्ती लक्षात घेता यंदा मंडळाने वयोवृद्धांना दर्शनासाठी प्रवेश बंद केला आहे. 65 वर्षाच्यावरील वृद्धांना यंदा दर्शनासाठी मंडपात प्रवेश दिला जाणार नाही. त्याशिवाय 10 वर्षाखालील लहान मुलांनादेखील प्रवेश दिला जाणार नसून त्यांच्यासाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.