टिक टॉकवर बंदी घालण्यात आल्यानंतर कंपनीची पहिली प्रतिक्रिया, केला अचाट दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने सोमवारी प्रसिद्ध टिकटॉक या अॅपसह 59 चीनी अॅप्सवर बंदी घातली आहे. सरकारने टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर कंपनीकडून पहिली प्रतिक्रीया आली असून त्यात त्यांनी काही दावेही केले आहेत. टिकटॉकच्या माध्यमातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो, असा दावा कंपनीने केला आहे.

हिंदुस्थान चीन सीमेवर लडाखमध्ये दोन्ही देशांत झालेल्या झटापटीत हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात चीनी वस्तूंवर बंदीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने सोमवारी टिकटॉकसह 59 चीनी अॅप्लिकेशनवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारकडून हा निर्णय कंपनीला सांगण्यात आला असून त्या पार्श्वभुमीवर कंपनीच्या अधिकाऱ्यांची सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे. त्या बैठकीत टिकटॉकला त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे.

दरम्यान कंपनीने याबाबत प्रतिक्रीया देताना काही अचाट दावे केले आहेत. ‘डेटा प्रायव्हसी व डेटा सिक्युरिटीबाबतच्या आम्ही देशातील सर्व अधिनियमांचे काटेकोरपणे पालन करत असून आमच्या हिंदुस्थानातील युजर्सची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही परदेशी सरकारला दिलेली नाही, चिनी सरकारलाही नाही. भविष्यात आमच्याकडे अशी मागणी करण्यात आली, तरीही आम्ही अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’, असा दावा टिकटॉकने केला आहे.

टिकटॉकने 14 हिंदुस्थानी भाषांमध्ये सेवा देत इंटरनेटमध्ये लोकशाहीच आणली आहे. यात कोट्यवधी सामान्य वापरकर्ते, कलाकार, स्टोरी टेलर, शिक्षणक्षेत्रातील मंडळी, व टिकटॉकच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालवणाऱ्या असंख्य लोकांचा समावेश आहे, असा दावा टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी केला आहे.