
ताडदेव येथील उषा किरण इमारत परिसरात शनिवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास एका कारला अचानक आग लागली होती. कारमायकल रोडवरील या इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या 3 गाड्या आगीत जळून खाक झाल्या होत्या. गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवले असल्याने ही आग लागल्याचा मेसेज व्हॉटसअपवर व्हायरल झाला होता. या मेसेजमुळे फक्त मुंबईतलेच नाही तर देशभरातील कारचालक चिंतेत पडले होते. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून यामुळे जवळपास सगळेजण घरातच थांबणे पसंत करत आहे. यामुळे अनेक दिवसांपासून गाड्या पार्कींगमध्येच उभ्या असून त्यात सॅनिटायझरची बाटली ठेवणाऱ्य़ांना आपल्या गाडीला आग तर लागणार नाही ना अशी चिंता या मेसेजनंतर सतावायला लागली होती.
उषा किरण इमारतीच्या पार्कींगमध्ये लागलेल्या आगीत ३ गाड्या जळून खाक झाल्या आहेत तर 10 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या आगीमध्ये गाड्यांचे संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या छताचेही नुकसान झाले आहे. पार्कींग अग्निशमन विभागाने ही आग तत्काळ विझवली होती. अग्निशमन दलाचे जवान जेव्हा घटनास्थळी पोहोचले होते तेव्हा त्यांना संपूर्ण गाडी पेटलेली दिसली, इंजिनकडच्या भागात आगीचे प्रमाण आणि धग जास्त होती असं अधिकाऱ्यांना दिसून आलं होतं. उंदीरांनी वायर कुरतडल्याने ही आग लागली होती का हे तपासण्याचे आदेश अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. गाडीला आग लागण्याच्या बहुतांश घटना वायर कुरतडल्याने होत असल्याचे माहिती असल्यानेच ही तपासणी करण्यास सांगण्यात आली होती.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी गाडीच्या मालकाकडे चौकशी केली. त्याने सांगितले की गाडीमध्ये सॅनिटायझरची बाटली त्यांनी ठेवली नव्हती. गाडी सॅनिटाईझही करून घेतल्या नव्हत्या. यामुळे जो व्हॉटसअपवर मेसेज फिरतोय तो चुकीचा असल्याचे कळाले. या मालकाने सांगितले की त्याने गाडी चालू केल्यानंतर धूर यायला लागला होता, यामुळे घाबरुन त्याने गाडी बंद केली आणि तो बाहेर आला. मालकाने सांगितलेला तपशील सीसीटीव्हीतील दृश्यांशी मेळ खात असल्याचे दिसून आले. सखोल चौकशीनंतर ही आग सदोष इलेक्ट्रीक सर्कीटमुळे लागली होती असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिसून आले. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे.


























































