
>> वृषाली पंढरी
आज महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पांडुरंगाला भेटण्याचा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस. लाखो भक्त आषाढी वारीची वाट पाहत असतात. यंदा कोविड- 19 च्या उद्रेकामुळे विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटता येणार नसल्याने भक्तांमध्ये थोडीशी नाराजी असली तरी यात कुणाचीच चूक नसल्याने व मुळातच सहिष्णू असल्याने वारकऱयांनी यंदाची पायी वारी रद्द करून देशापुढे समंजसपणाचा एक आदर्श ठेवला आहे. शिवाय महाराष्ट्र सरकारनेही हे प्रकरण अतिशय कौशल्याने हाताळल्याने फारसा गंभीर प्रश्न निर्माण झाला नाही.
सत्य, त्रेता, द्वापार आणि कली अशा चार युगांचे एक चक्र म्हणजेच एक फेरा होतो. सध्या पृथ्वीतत्त्वाचा सातवा फेरा चालू आहे. 7 बाय 4 म्हणजे 28. सध्या 28 वे युग चालू आहे. विठ्ठल 28 युगांपासून उभाच आहे. 4 वेद, 18 पुराणे आणि 6 शास्त्र यांची बेरीज 28 असणे आणि त्यांनी पांडुरंगाचे गुणगान करणे यालाही एक वेगळे महत्त्व आहे. श्री विठ्ठलाची महतीच अशी की, विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस’ उभा असून सर्व वेद, पुराणे आणि शास्त्रs त्याचेच गुणगान करताना दिसतात.
एकादशीची पौराणिक कथा अशी आहे. ‘मृदुमान्य’ नावाच्या एका राक्षसाने भगवान शंकराची उपासना करून ‘‘तुला कोणाकडूनही मरण येणार नाही’’ असा वर मागून घेतला. पुढे त्याने सर्व देव जिंकण्याचा निश्चय केला. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे गुहेत लपून बसले. मृदुमान्य राक्षस त्यांचा शोध घेत फिरत होता. त्यामुळे तीन दिवस झाले तरी देवांना बाहेर पडता येईना. शेवटी त्या तिघांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक देवता उत्पन्न झाली. तीच ही एकादशी होय. तिने मृदुमान्याला ठार मारले. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. धार्मिक लोक देवाच्या भक्तीसाठी दररोज काही धार्मिक पुस्तकाचे वाचन, स्वतःचे आचरण शुध्द करण्यासाठी एखादे व्रत घेतात किंवा तत्सम नियम करतात व चार महिने ते न चुकता पाळतात. या दिवशी उपवास करून पुढील चार महिन्यांत जे काही नियम पाळावयाचे असतील, त्याविषयी संकल्प करून ते निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्याबद्दल श्री महाविष्णूची प्रार्थना करतात. या दिवशी लोक नदीकाठी स्नान करतात. पूजेच्या वेळी एक हजार किंवा एकशेआठ तुळशी विष्णूला किंवा पांडुरंगाला वाहतात. पूर्ण दिवस भजन, पूजन, कीर्तनात घालवतात.
आषाढ महिन्यातील इंग्रजी जून-जुलै शुक्ल पक्षातील अकरावी तिथी ही प्रथमा एकादशी वा महाएकादशी किंवा देव-शयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हा मोठा पवित्र दिवस आहे. या दिवशी बहुसंख्य मराठी लोक उपवास करतात. या दिवसापासून चतुर्मास (चार महिन्यांचा काळ) सुरू होतो, जो कार्तिकी एकादशीला संपतो. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेस जातात आणि योगनिद्रेतून बाहेर येतात ते कार्तिकी एकादशीला. या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. ताम्रपटांवरून इ.स. 516 मध्ये राष्ट्रकुटांच्या काळात पंढरपूर हे चांगली लोकवस्ती असलेले नगर असल्याचा पुरावा मिळतो. पादुका-प्रदक्षिणेची वहिवाट इ.स.1296 मध्ये चालू झाली; तर इ.स.1650 मध्ये हैबतबाबांनी आळंदीहून निघून पंढरपूरला पोहोचणाऱया पालखीची प्रथा पाडली. नंतर इतर संतांच्या पालख्या, दिंडय़ा यांसह लाखो स्त्राr, पुरुष भक्त यात वाढ होत हल्ली दरवर्षी आषाढी एकादशीच्या वारीत दहा लाखांपेक्षा अधिक विठ्ठलभक्त या सोहळ्याचा आनंद घेत आहेत. दरवर्षी
‘आजि संसार सुफळ झाला गे माये
देखियले पाय विठ्ठोबाचे
सो मज व्हावा, तो मन व्हावा
वेळोवेळा व्हावा पांडुरंग’
या भावनेने वारकरी पंढरीला जातात. यंदा वारी रद्द झाल्याने विठोबाचे पाय दिसले नाहीत तरी भक्तिभाव मात्र तोच असणार आहे.




























































