मलेरिया, डेंग्यूची 20 हजारांहून जास्त ठिकाणे केली नष्ट; डास नियंत्रणासाठी जून महिन्यात पालिकेची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, साथीचे आजार पसरू नयेत म्हणून पालिकेने कंबर कसली असून जून महिन्यात राबवलेल्या मोहिमेत विविध ठिकाणची डेंग्यू, मलेरियाची तब्बल 20 हजार 194 ठिकाणे शोधून नष्ट केली. या आधी जानेवारी ते मे महिन्यापर्यंत राबवलेल्या मोहिमेत 1 लाख 8 हजार 26 वस्तू हटवून संभाव्य धोका कमी केला होता.

डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार निर्माण होऊ नये, यासाठी विविध ठिकाणच्या विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव अशी एकूण 1 लाख 72 हजार 572 ठिकाणे तपासून त्यातील मलेरिया पसरवणारी 4 हजार 601 ठिकाणे नष्ट करण्यात आली. डेंग्यूच्या संभाव्य अळ्या सापडणाऱया पाण्याची पिंपे, टायर, ऑड आर्टिकल, पेट्री लेट्स, फेंगशुई आणि मनी प्लांटची झाडे अशी एकूण 53 लाख 92 हजार 754 ठिकाणांची तपासणी करण्यात आली.

पाणी साचू देऊ नका!
अनेक गगनचुंबी इमारतींमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. अनेक झोपडपट्टय़ांमध्ये पाण्याची पिंपं भरून ठेवलेली आहेत. लोक गावी गेल्यामुळे या पिंपांमध्ये डेंग्यूच्या अळ्या मोठय़ा प्रमाणात सापडल्या आहेत. पावसाळ्यात छपरावरील प्लॅस्टिक/टारपोलिनवर पाणी साचते. घरात आणि घराबाहेरील भांडय़ाकुंडय़ांमध्ये पाणी साचणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.