
शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये एवढा करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादींच्या जेवणांअभावी हालअपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळीची किंमत 30 मार्चपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दहा रुपयाऐवजी पाच रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती. ही मुदत त्यापुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आली असून 6 कोटी रुपये एवढय़ा वाढीव खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.
15 जिल्हा बँकांमध्येही होणार सरकारी बँकिंग व्यवहार
सरकारी कर्मचाऱयांचे वेतन व निवृत्ती वेतन वगळता अन्य सरकारी बँकिंग व्यवहार करण्यास 15 जिल्हा मध्यवर्ती बँकांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली . यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, सिंधुदूर्ग, नगर, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ – कोकण ग्रामीण बँक या दोन प्रादेशिक ग्रामीण बँक, आयडीबीआय बँक व सहकार विभागाने शिफारस केलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांनर शासकीय बँकींग व्यवहारांबरोबरच सार्वजनिक उपक्रम, महामंडळ यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी देण्यात आली आहे. यामुळे या बँकांची परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.




























































