कोपरगाव – व्हॉट्‌सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली, गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्‌सअॅप ग्रुपवर मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी संबंधित व्हॉट्‌सऍपग्रुपचा ॲडमिन माधव गुरुजी व बाबुभाई अब्दुलभाई सय्यद (राहणार संजीवनी गेटसमोर, शिंगणापूर तालुका कोपरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ‘संजीवनी ग्रुप’मध्ये सदस्य असणाऱ्या माधव गुरूजी याने एका व्हिडिओमध्ये मुस्लीम धर्माविरुद्ध अपशब्द वापरून आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप ग्रुपवर प्रसारित केली. यावर आरोपी क्रमांक दोन बाबुभाई अब्दुलभाई सय्यद याने मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखविणारा आक्षेपार्ह व्हिडिओ तत्काळ डिलीट करण्याबाबत माधव गुरुजी याला सूचना दिली नाही तसंच त्याला ग्रुपमधून काढून टाकले नाही. तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ बाबत पोलीस स्टेशनला माहिती दिली नाही. त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपवर नियंत्रण न ठेवता निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आय्युब कादरभाई शेख (58, एकता कॉलनी, बैल बाजार रोड, कोपरगाव) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ बाबुभाई अब्दुलभाई सय्यद या आरोपीस अटक केली.