कर्नाटकातून दुचाकीने ‘विना पास’ मालवणात, कारवाईच्या भीतीने पुन्हा धरला कर्नाटकचा रस्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्नाटक राज्यातून दुचाकीने विनापासप्रवास करत मालवण तालुक्यातील चौके गावात दाखल झालेल्या दोघा चिरेखाण कामगारांना फौजदारी कारवाईच्या भीतीने पुन्हा माघारी परतावे लागले. सरपंच राजा गावडे यांनी विना पास परजिल्ह्यातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चौके गावात प्रवेश नसल्याचे सांगत आक्रमक भूमिका घेतली आहे.

जगासह आपल्या देशावर कोरोना संकट वाढत आहे. कोरोना संसर्ग आपल्या गावात पोहचू नये, पसरू नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राम स्तरावर आदर्शवत असे काम चालू आहे. ग्रामसमिती खबरदारी उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करत आहे. मात्र काहीवेळा अपवादात्मक स्थितीत गावात आलेल्या काही व्यक्तींकडून कोरोना खबरदारी उपाययोजना व क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार घडले आहे. असाच एक प्रकार शनिवारी चौके गावात घडला.

कर्नाटक येथून मोटारसायकलने दोन व्यक्ती (चिरे खाण कामगार) दाखल झाले. जिल्ह्याबाहेर आलेल्या व्यक्तिची नोंद ग्राम समितीकडे करून समिती व वैद्यकीय अधिकारी जशी सूचना करतील त्यानुसार त्या व्यक्तिने 14 दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. मात्र गावात आलेल्या दोन्ही व्यक्तीबाबत समितीच्या वतीने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्ती प्रवासाचा कोणताही पास न घेता कर्नाटकातून मालवणात आले. अन्य जिल्ह्यात, राज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना अशाप्रकारे बेकायदेशीररित्या कोणीही गावात येत असेल तर त्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही. गावातील प्रत्येक ग्रामस्थांची सुरक्षा आम्हाला सर्वात महत्वाची असल्याचे सरपंच राजा गावडे यांनी सांगितले. तर गावात छुप्या पद्धतीने आलेल्या व्यक्तींवर कारवाईचे आदेश सरपंच गावडे यांनी ग्रामसेवक पाटील यांना दिले.

दरम्यान, चौके गावात विनापास काही व्यक्ती आल्याची तक्रार तहसिलदार अजय पाटणे यांच्याकडे ही करण्यात आली. त्यांनीही तलाठी, पोलीस पाटील यांना माहिती घेऊन फौजदारी कारवाई दाखल करण्याचे आदेश दिले.

कारवाईच्या भीतीने ‘ते’ पळाले
विना पास गावात प्रवेश केल्यामुळे आपल्यावर कारवाई होणार याबाबत माहिती कर्नाटकातून आलेल्या त्या दोघांना मिळाली. त्यांनंतर त्यांनी तात्काळ गावातून पळ काढला. ग्रामसेवक त्यांना शोधण्यास गेले असता ते कामगार कोठेही सापडून आले नाहीत. ते पुन्हा कर्नाटक ला आपल्या गावी माघारी गेल्याची माहिती मिळाली आहे.