निळजे पूल अखेर वाहतुकीसाठी खुला, एक महिन्याच्या आत दुरुस्तीचे काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीजवळील निळजे पूल धोकादायक झाल्याने 15 जूनपासून वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे वाहतुकीचा ताण कल्याण-शीळ मार्गावरील पुलावर आला होता. मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून अवघ्या एक महिन्याच्या आत पुलाची दुरुस्ती पूर्ण केली असून आजपासून हलक्या वाहनांसाठी हा पूल खुला करण्यात आला.

दिवा-पनवेल मार्गावरील निळजे उड्डाणपूल 50 वर्षांपूर्वीचा आहे. वाढत्या रहदारीमुळे तो कमकुवत ठरला आहे. मध्यंतरी आयआयटीच्या तज्ञांनी पुलाची पाहणी केली होती. त्यांनी हा पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचा अहवाल रेल्वेला दिला होता. त्यामुळे रेल्वेने 15 जूनपासून हा पूल सर्व वाहतुकीसाठी बंद केला. निळजे रेल्वे उड्डाणपूल बंद केल्यानंतर वाहनधारकांना कल्याण-शीळ या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत होता. आधीच या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यातच निळजे पूल बंद केल्यानंतर या मार्गावर अधिकचा ताण आला होता. दोन कि.मी.साठी दोन तास रस्त्यात अडकून पडावे लागत आहे. मात्र एमएसआरडीसीने नियोजनबद्ध पद्धतीने दुरुस्ती काम करून एक महिन्याच्या आत पूल पुन्हा सुरू केला.