
धुळे तालुक्यातील अजनाळे येथे पेरणीसाठी आणलेले प्रकिया केलेल्या शेंगदाण्याचे बियाणे खाल्ल्याने सहा मुलांना विषबाधा झाली आहे. त्यापैकी पाच वर्षाच्या समशेर पवार या मुलाचा मृत्यू झाला आहे. अन्य पाच मुलांना कमीअधिक प्रमाणात विषबाधा झाली आहे. त्यांना भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धुळे तालक्यातील अजनाळे हे फासेपारधी समाजाचे गाव. बहुसंख्य लोक शेतजमीन कसून उदरनिर्वाह करतात. गावातील पवार कुटुंबातील वयोवृद्धाने शेंगदाण्याचे बीज योग्य वातावरण निर्माण होताच पेरणीसाठी आणले होते. पण, घरात असलेल्या लहान मुलांनी आजोबांनी आपल्यासाठी खाऊ आणला आहे असा समज झाल्याने या पिशवीतील शेंगदाणे खाल्ले. काही वेळानंतर मुलांना उलटय़ा होऊ लागल्या. त्यानंतर काही लोकांनी सर्व सहा मुलांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण, उपचार घेत असताना समशेर पवार या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर इतर पाच मुलांची प्रकृती चिंताजनक आहे.




























































