
हिंदुस्थानात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 32,695 नवे रुग्ण आढळले असून 606 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील कोरोना संक्रमणाच्या फैलावाचा अभ्यास करुन भारतीय विज्ञान संस्थेने (आयआयएससी) वर्तवलेले अंदाज धक्कादायक आहेत. कोरोनाच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यास मार्च 2021 मध्ये देशात कोरोनाबाधितांची संख्या 6 कोटी 18 लाखांवर पोहचेल असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही करण्यात आला आहे.
कोरोनाच फैलाव रोखण्यात यश आल्यास मार्च 2021पर्यंत देशात 37.4 लाख कोरोनाबाधित असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, परिस्थिती गंभीर झाल्यास देशात 6.18 कोटीपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या पोहचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 23 मार्च ते 18 जूनपर्यंतच्या कोरोना फैलावाच्या आकडेवारीच्या अभ्यासानुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. देशातील कोरोना फैलावाची बदलत जाणारी परिस्थिती, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न तसेच लस शोधण्यात यश आल्यास परिस्थिती वेगळी असेल, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश आल्यास आणि परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास मार्च 2021 मध्ये हिंदुस्थानात सर्वाधिक कोरोनाबाधित असतील आणि हिंदुस्थान कोरोना महामारीच्या शिखरावर असेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मात्र, परिस्थिती योग्य प्रकारे हाताळल्यास सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानात सर्वाधिक कोरोनाबाधित असतील आणि त्यानंतर संक्रमितांच्या संख्येत घट होण्यास सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आठवड्यात एक ते दोन दिवस लॉकडाऊन करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगसह इतर सूचनांचे जनतेने पालन करावे. तसेच रुग्ण बरे होण्याच प्रमाणात वाढ होण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. संशयितांचा शोध घेत क्वॉरंटाईनसारख्या उपाययोजना केल्यास कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश येईल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.






























































