
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या इयत्ता 12वीचा निकाल गुरुवारी दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. नाशिक विभागातील चार जिह्यांमधून परीक्षा दिलेल्या एक लाख 56 हजार 789 पैकी एक लाख 39 हजार 346 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागाची ही टक्केवारी 88.87 इतकी आहे.
शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता निकाल जाहीर करण्यात आला. त्यावरून विद्यार्थ्यांनी विषयनिहाय संपादित गुणांची प्रत घेतली. नाशिक विभागीय मंडळात नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हय़ांचा समावेश आहे. विभागातील 1035 महाविद्यालयांमधून एक लाख 57 हजार 336 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी एक लाख 56 हजार 789 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक लाख 39 हजार 346 (88.87 टक्के) उत्तीर्ण झाले. विभागात सर्वाधिक 91 टक्के निकाल धुळय़ाचा लागला. द्वितीय स्थानी जळगाव- 89.72, तिसऱया स्थानी नाशिक- 89.46 आणि चौथ्या क्रमांकावर नंदुरबार- 80.35 अशी टक्केवारी आहे.
गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी उद्या 17 जुलैपासून अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येईल. गुणपडताळणीसाठी 27 जुलैपर्यंत, तर छायाप्रतीसाठी 5 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाकरिता उत्तरपत्रिकेची छायाप्रत आवश्यक असते. ती मिळाल्यापासून पाच दिवसांत विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे, अशी माहिती विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील आणि सचिव नितीन उपासनी यांनी दिली.
नाशिक विभागातील जिल्हानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी आणि कंसात टक्केवारी पुढीलप्रमाणे ः नाशिक- 62,734 (89.46), धुळे- 21,842 (91.11), जळगाव- 42,137 (89.72), नंदुरबार- 12,633 (80.35), एकूण- 1,39,346 (88.87).
विज्ञान शाखेची आघाडी
विज्ञान शाखेचा निकाल 96.82 टक्के आहे. विभागातून या शाखेचे 67 हजार 246 पैकी 65 हजार 108 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेचे 60 हजार 643 पैकी 48 हजार 107 (79.33), वाणिज्यचे 22 हजार 981 पैकी 21 हजार 365 (92.97) उत्तीर्ण झाले. व्होकेशनलचा निकाल 80.52 टक्के आहे.
विभागाची प्रगती
गेल्या चार वर्षांतील निकालाची आकडेवारी लक्षात घेतली तर 2020चा निकाल हा सर्वाधिक आहे. 2017 मध्ये 88.22, 2018 मध्ये 86.13, 2019ला 84.77, तर या वर्षी 88.87 टक्के असा निकाल लागला आहे.
प्रथम श्रेणीत
62 हजार विद्यार्थी
नाशिक विभागात प्रथम श्रेणीतून 62 हजार 650 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्रावीण्य 12 हजार 465 जणांनी मिळविले. द्वितीय श्रेणीत 60 हजार 622, तर उत्तीर्ण श्रेणीत 3 हजार 609 जण आहेत.
मुलींचीच बाजी
दरवर्षीप्रमाणे मुलींनी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत आघाडी कायम ठेवली आहे. विभागात 89 हजार 25 मुलांनी, तर 67 हजार 764 मुलींनी परीक्षा दिली. त्यातील 76 हजार 638 (86.09) मुले आणि 62 हजार 708 (92.54 टक्के) मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.






























































