
1997 साली हिंदुस्थान सरकारची 123 कोटींची फसवणूक करून बेपत्ता झालेला हिरे व्यापारी अखेर 23 वर्षांनी सापडला. अटक टाळण्यासाठी तो ओळख लपवून राहत होता. अखेर गुन्हे शाखेच्या युनीट-1 ने त्याला गिरगावातून शोधून काढून पुढील कारवाईसाठी प्रतिबंध शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हरिश कल्याणदास भावसार ऊर्फ हरीकृष्णा उर्फ परेश झवेरी असे त्या हिरे व्यापाराचे नाव आहे. त्याची शारदा डायमंड नावाची कंपनी होती. आणि ती कंपनी डायमंडचा कच्चा माल सिंगापूरहुन हिंदुस्थानात आणायचे काम करायची. दरम्यान, 1997 साली त्या कंपनीने हिंदुस्थान सरकारची 123 कोटींची फसवणूक केली. त्यामुळे देशाच्या अर्थ खात्याच्या महसूल विभागाने हरिशविरोधात कॅफेपोसा कायद्यांतर्गत कारवाई करुन स्थानबद्ध करण्याचे तेव्हा आदेश दिले होते. मात्र तेव्हा पासून हरिश ओळख लपवून राहत होता.
गिरगावच्या खेतवाडीत लपून राहत होता
हिंदुस्थान सरकारला फसवणारा डायमंड व्यापारी परेश झवेरी खेतवाडीत लपून राहत असल्याची माहिती युनिट-1 ला मिळाली. त्यानंतर युनीट इन्चार्ज विनायक मेर, निरीक्षक महेश तावडे व पथकाने शोध घेऊन 23 वर्षे फरार असलेल्या हरिशला पकडले.


























































