
राज्याच्या बारावीच्या निकालात मुंबई विभागाची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षा यंदा सरस ठरली आहे. मुंबईच्या निकालात तब्बल 5.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबईचा निकाल 89.35 टक्के इतका लागला आहे. गेल्यावर्षी हा निकाल 83.85 टक्के इतका होता. गेल्यावर्षी विभागनिहाय निकालात मुंबई शेवटून दुसऱ्या स्थानावर होती. यंदा मात्र मुंबई एक पायरी वर गेली असून शेवटून तिसरे स्थान मिळविले आहे. तसेच विभागात रायगड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 91.28 टक्के इतका लागला असून सर्वात कमी निकाल दक्षिण मुंबईचा 86.72 टक्के इतका लागला आहे.
मुंबई विभागातून 3 लाख 13 हजार 291 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांपैकी 2 लाख 79 हजार 931 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून एकूण 85 हजार 81 विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेची परीक्षा दिली त्यांपैकी 80 हजार 964 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कला शाखेच्या 47 हजार 184 विद्यार्थ्यांपैकी 37 हजार 941 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागातील 1 लाख 76 हजार 414 विद्यार्थ्यांनी कॉमर्स शाखेची परीक्षा दिली. यांपैकी 1 लाख 56 हजार 794 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची संख्या यंदा वाढली आहे. विभागातून 4 हजार 612 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यांपैकी 4 हजार 232 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुंबई विभागात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला असून सर्वात कमी निकाल कला शाखेचा लागला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई विभागातील 3 हजार 109 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.
अभ्यासक्रम मुंबई विभागाचा शाखानिहाय निकाल (टक्केवारी)
विज्ञान 95.16
कला 80.41
वाणिज्य 88.88
व्यवसाय 91.76
विषयानुसार वाढलेला निकाल
विषय वर्ष 2019 वर्ष 2020
गणित 92.07 97.20
फिजिक्स 97.60 94.49
केमिस्ट्री 95.87 98.23
बायोलॉजी 98.66 96.54
तीन वर्षांतील विज्ञान शाखेचा निकाल (टक्केवारी)
2018 95.85
2019 92.60
2020 96.93
मुंबई विभागाचा एकूण निकाल
विभाग विज्ञान कला वाणिज्य एचसीव्हीसी एकूण
रायगड 97.24 80.49 93.18 84.55 91.28
मुंबई उप.2 95.00 79.07 89.54 96.96 90.21
ठाणे 95.62 79.73 89.76 90.84 89.86
पालघर 95.98 79.92 91.95 90.32 89.85
मुंबई उप.1 94.57 81.91 86.92 92.07 88.54
मुंबई शहर 91.93 82.67 85.40 94.23 86.72
दिव्यांग असूनही सर्वेशने मिळवले 90 टक्के, वकील होण्याची इच्छा
रुईया महाविद्यालयात कला शाखेतून बारावीच्या परीक्षा देणाऱ्या सर्वेश नाईक हा दृष्टिहीन आहे. त्याने बारावीच्या परीक्षेत 90 टक्के गुण मिळवले. आपले पालक, शिक्षक आणि पर्ल व्हिजन सामाजिक संस्थेला त्याने या यशाचे श्रेय दिले आहे. सर्वेशला वकील होण्याची इच्छा आहे.






























































