
>> देवेंद्र भगत
मुंबईतील धोकादायक इमारती रिकाम्या करून या रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था माहुलमध्ये करण्यास परवानगी द्यावी यासाठी पालिका मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. मात्र आधीच जीवघेण्या प्रदूषणामुळे या ठिकाणी राहणाऱया प्रकल्पबाधितांना पालिकेकडून इतर ठिकाणी घरे दिली जात असताना पालिकेच्या या निर्णयाला जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.
मुंबईत पालिकेच्या अखत्यारीतील 443 इमारती अतिधोकादायक असल्याचे समोर आले आहे. यातील 122 इमारती रिकामी करण्यात आल्या असून अजूनही 221 धोकादायक इमारतींमध्ये रहिवासी राहत आहेत. या इमारती कोसळून जीवितहानी होण्याचा धोका असल्यामुळे या इमारती तातडीने रिकाम्या करण्याची कार्यवाही कार्यवाही करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. पुनर्विकास होईपर्यंत या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था सध्या माहुल या ठिकाणी करण्याची परवानगी द्यावी यासाठी पालिका मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मुंबईत धोकादायक असलेल्या 16 हजार इमारतींबाबत सरकारने पाच वर्षांचा आराखडा तयार करून कार्यवाही केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
पुनर्विकासाला 15 दिवसांत परवानगी देणार
धोकादायक इमारतींमधील 122 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. तर अनेक प्रकरणांत रहिवाशांमध्ये एकजूट नसल्याने पुनर्विकास रखडला आहे. शिवाय मुंबईसारख्या शहरात पर्यायी जागा ‘बजेट’मध्ये मिळत नसल्याने रहिवासी जीव मुठीत घेऊन राहतात. हा प्रश्न सोडवण्यासाठी धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या पदाधिकाऱयांनी आपल्या स्तरावर समन्वय साधून विकासकाच्या माध्यमातून आराखडे तयार करावेत. पुनर्विकासाच्या या आराखडय़ांना पालिका केवळ 15 दिवसांत पालिका परवानगी देईल. यासाठी खास यंत्रणा सुरू केली जाईल असेही अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सांगितले.
…म्हणूनच माहुलला विरोध
– पालिकेच्या माध्यमातून मुंबईत होणारे रस्ता रुंदीकरण, नवीन रस्ते, नाला रुंदीकरण अशा विविध प्रकल्पांसह तानसा पाइपलाईनवरील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन चेंबूरजवळील माहुल परिसरात करण्यात येते.
– मात्र या ठिकाणी असणाऱया विविध रिफायनरी प्रकल्पांमुळे, केमिकल प्रदूषणामुळे माहुल प्रकल्पग्रस्तांना टीबी, अस्थमा, टीबीसारख्या श्वसनाच्या आजारांबरोबरच त्वचा विकार, पॅन्सरसारखे जिवघेणे आजारही झाल्याचे समोर आले आहे.
– या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या अहवालानुसार न्यायालयाने प्रकल्पग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी घरे द्यावीत असे निर्देश दिले आहेत. यानुसार पालिका राज्य सरकारच्या माध्यमातून कार्यवाहीदेखील करीत आहे.





























































