
हिंदुस्थानच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला असून कुलभूषण जाधव यांना तिसऱ्यांदा दूतावासाची कायदेशीर मदत देण्यात येणार आहे. या भेटीच्या वेळी पाकिस्तानी अधिकारी पाळत ठेवणार नाहीत, असेही पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले हिंदुस्थानी नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली असून कुलभूषण जाधव यांना नियमाप्रमाणे दुतावासाची कायदेशीर उपलब्ध करून देण्यात यावी अशा शब्दांत पाकिस्तानला फटकारले. त्यानंतर काल दुसऱ्यांदा कुलभूषण जाधव यांना भेटण्याची हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली. मात्र या भेटीच्यावेळी आक्षेप घेऊनही पाकिस्तानी अधिकारी तेथेच उभे राहिले. त्यामुळे हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना जाधव यांच्याशी व्यवस्थित बोलता आले नाही.पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी जाधव यांची वकिलपत्रावर स्वाक्षरीही घेऊ दिली नाही. भेटीच्या ठिकाणी कॅमेरेही लावण्यात आलेले होते.
हटवादी भूमिकेवरून हिंदुस्थानने पाकिस्तानला चांगलेच फटकारले. कुलभूषण जाधव यांच्या भेटीत अडथळे आणणे हा जीनिव्हा कराराचा भंग असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवमान असल्याचे सांगत हिंदुस्थानने पुन्हा भेटीची मागणी केली. शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाह महमुद कुरेशी यांनी हिंदुस्थानवर दुगाण्या झाडल्या. बिना काच व व्हिडीओ रेकॉर्डिंगची भेट घेण्याची शर्त स्वीकारली असून भेटीच्या वेळी कोणताही पाकिस्तानी अधिकारी तेथे उपस्थित राहणार नाही असेही ते म्हणाले.


























































