आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन संपुष्टात येणार असून आता पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नाही. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनलॉक-1 च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच उद्योग, व्यापार, व्यवसायाला परवानगी देण्यात येत असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यापूर्वीचा लॉकडाऊन संपल्यानंतर सम-विषम तत्त्वावर अनलॉक-1 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्यानंतर शहर आणि औद्योगिक वसाहतींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतच नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे शहरासह वाळूज परिसरात पुन्हा एकदा 10 ते 18 जुलै दरम्यान जनता कफ्र्यू (लॉकडाऊन) लावण्यात आला होता. आजच्या जनता कफ्र्यूच्या शेवटच्या दिवशी उद्यापासून पुन्हा सुरू करण्यात येत असलेल्या अनलॉ-1 च्या अंमलबजावणीविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी या संयुक्त पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत
जनता कर्फ्युच्या 9 दिवसाच्या काळात सर्व स्तरातील नागरिकांनी प्रशासनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता उद्यापासून पुन्हा अनलॉक होत असून सकाळी ७ ते सायंकाळी 7 पर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.
दोन दिवसात व्यापारी, विक्रेत्यांची टेस्ट
आतापर्यंत सुमारे 20 हजार अँटीजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या असून आता यापुढे व्यापारी, विक्रेत्यांच्या अँटीजेन टेस्टसाठी 25 पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दोन दिवसात त्यांची टेस्ट पूर्ण केली जाईल. टेस्टमध्ये निगेटिव्ह निघालेल्या व्यापारी, विव्रेâत्यांना टास्क फोर्सच्या पथकप्रमुख अपर्णा थेटे व घनकचरा व्यवस्थापनप्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र दिले जाईल. एमएचएमएच अॅपमध्ये 92 हजार ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली असून लॉकडाऊनच्या काळात 14 हजार नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या आरोग्याबद्दल चौकशी करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
बुधवारपर्यंत सम-विषम
लॉकडाऊननंतर शहरातील सर्व व्यवहार सुरू होणार का? असा प्रश्न विचारला असता जिल्हाधिकारी म्हणाले, लॉकडाऊन उघडल्यामुळे बाजारपेठेत एकच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पोलीस उपायुक्त, व्यापारी, व्यावसायिकांची मते जाणून घेत आहे. त्यांचा अहवाल प्राप्त होणार असून बुधवारपर्यंत सम-विषम नियमानुसार बाजारपेठ सुरू ठेवली जाईल. त्यानंतर मात्र परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


























































