सावधान! कोरोनाचा कम्युनिटी संसर्ग सुरू, ‘आयएमए’चा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहा लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. रोजच्या रोज हजारो रुग्ण सापडत आहेत. ही परिस्थिती खरंच गंभीर असून कोरोनाचा कम्युनिटी संसर्ग झाला आहे असे इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) म्हटले आहे.

सुरुवातीला शहरी भागांपुरता मर्यादित असणारा कोरोना आता ग्रामीण भागांमध्ये पसरला आहे. हे अत्यंत धोकादायक संकेत असल्याचे आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा यांनी सांगितले. शहरांमधील रुग्णांची संख्या कमी होत चालली असताना ग्रामीण भागांमध्ये परिस्थिती हाताळणे कठीण होऊन बसले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, गोवा आणि मध्य प्रदेशमध्ये कोरोनाचे नवे हॉटस्पॉट आढळू लागले आहेत असे त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारांनी केंद्र सरकारची मदत घ्यावी असे आवाहन डॉ. मोंगा यांनी केले आहे. 70 टक्के लोकसंख्येला या विषाणूची लागण होऊन त्यांच्यामध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण होणे आणि इतर 30 टक्के लोकसंख्येला संसर्गापासून बचावासाठी प्रतिबंधक उपाय करणे असे दोनच पर्याय आता उरले असल्याचे त्यांनी सांगितले.