
कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर व उद्योगांवर विपरीत परिणाम झाला आहे. कोरोनाची साथ व टाळेबंदी यांच्यामुळे बेरोजगारी, वेतन कपात आणि सक्तीने घरातूनच काम करणे यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. पुरेशी झोप न लागणे, पाठदुखी, थकवा याचबरोबर तणावाचा आरोग्याला सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे, अशी माहिती ‘टाटा सॉल्ट लाइट’च्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यानंतर आलेली ही हिंदुस्थानातील चौथी आर्थिक मंदी आहे. आर्थिक उदारीकरणानंतरची ही पहिली मंदी आहे, तर कदाचित आतापर्यंतची ही सर्वात वाईट मंदी ठरणार आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. काम आणि तंत्रज्ञान यांच्याबद्दलच्या संतापाला पुरुष अधिक प्रमाणात बळी पडतात. या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, (जनरेशन झेड – 18 ते 25 वर्षे वयोगटातील व्यक्ती) तंत्रज्ञानातील किरकोळ समस्यांमुळेही तरुणाईचा तोल गमावत असून त्या तुलनेत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती संतुलन राखून असतात. तरुणाईतील 6 जणांपैकी 1, म्हणजे 16 टक्के व्यक्ती कबूल करतात, की तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या हे त्यांच्या तणावाचे प्रमुख कारण आहे. 45 वर्षांपुढील वयाच्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण 12 टक्के आहे. त्यामुळे तणावाच्या काळात शांत आणि सकारात्मक राहावे, चालणे, योगासने, जलतरण यांसारखे व्यायाम करावेत. रात्री 6 ते 8 तास झोप घेणेही आवश्यक आहे, असा सल्ला टाटा न्युट्रिकेअरच्या आहारतज्ञ कविता देकगण देतात.





























































