अमरावतीत एका दिवसातील सर्वाधिक वाढ, कोरोनाग्रस्ताचा आकडा 1251 वर; मृतांची संख्या 39

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्ताची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुर्वीच्या तुलनेत तर आता अमरावती जिल्ह्याने नव्या विक्रमाची नोंद केली. शनिवारी रात्री आलेल्या अहवालात एकुण ८१ नवे रुग्ण आढळुन आले तर आज दुपारपर्यंत पुन्हा २३ रुग्णाची त्यात भर पडली. त्यामुळे ही संख्या आता १२५१ झाली आहे. जिल्हा कोविड रुग्णालयात माताफैल येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या जिल्ह्यात ३९ झाली आहे.

यापूर्वी सर्वाधिक एकाच दिवशी ६० रुग्ण कोरोनाग्रस्त आढळुन आले होते. चालू आठवड्यात त्यावरील मात झाली असून काल रात्री दिवसभरात एकुण ८१ रुग्ण आढळुन आले. यापूर्वी शहरापुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहचला असल्यामुळे त्या भागातही आता संचारबंदी लावण्याची वेळ आली आहे.

अमरावतीच्या जिल्हाधिकार्‍यांनी वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता दर शनिवारी-रविवारी जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. यावेळी दुसरा आठवडा असला तरी कोरोनाग्रस्ताची संख्या अद्यापही कमी झालेली नाही. एकीकडे अमरावती शहरात जनता कर्फ्यूला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. तरी देखील कोरोनाग्रस्ताचा आकडा कमी होतांना दिसण्याऐवजी रोजच वाढत चाललेला आहे.

आज सकाळी आलेल्या अहवालात एकुण १६ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळुन आले तर दुपारी आलेल्या अहवालात पुन्हा ७ जण कोरोनाग्रस्त आहे. यापैकी हनुमाननगरात चार जण कोरोनाग्रस्त असून ग्रामीण भागातून थुगाव पिंप्री येथे २ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळुन आले आहे. या व्यतिरिक्त शहराच्या वेगवेगळ्या भागात कोरोनाग्रस्त आढळुन येत आहे. दुपारी आलेल्या अहवालात पन्नालाल नगर महिला २१, पुरुष ५५, वलगाव, अचलपूर ३५ महिला, भाजीबाजार पुरुष ४५, अलीमनगर पुरुष ४० वर्ष, श्रीनाथवाडी १३ वर्ष बालक तर चांदुररेल्वे येथील ४० वर्षीय पुरुष कोरोनाग्रस्त आहे. आज दुपारपर्यंत हा आकडा एकुण १२५१ झाला आहे. आतापर्यंत ५५९ जणांना सुट्टी देण्यात आली आहे. तर ४३० रुग्ण दवाखान्यात दाखल झाले. तर ३९ जणांचा मृत्यू झाला.