
कोरोनाचा फटका हिंदुस्थानातील क्रिकेट स्पर्धांनाही बसणार आहे. कोरोनाची देशातील परिस्थिती अजून नियंत्रणात आली नसून क्रिकेट मोसमालाही अद्याप सुरुवात झालेली नाही. याशिवाय क्रिकेट स्पर्धा केव्हा सुरू होतील? याबाबतही प्रश्नचिन्ह कायम आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत खेळाडूंचा आर्थिक प्रश्न कसा सोडवता येईल, कोणत्या स्पर्धांचे आयोजन करता येईल यांसारख्या विषयांवर चर्चा करून पुढची आखणी केलीय. उशिरा मोसम सुरू होणार असल्यामुळे रणजी, विनू मंकड या स्पर्धा घेण्यासह सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धा आयोजित करण्यासाठी बीसीसीआय पुढाकार घेत आहे. रणजी स्पर्धेमुळे खेळाडूंना जास्त मानधन मिळते. त्यामुळे रणजी स्पर्धेला प्राधान्य देण्यात येणार आहे अशा प्रकारचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
खेळाडूला मिळतात 10 ते 12 लाख रुपये
हिंदुस्थानातील स्थानिक क्रिकेटपटूंना आयपीएलच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करता येते. त्यानंतर रणजी स्पर्धेद्वारे खेळाडू आर्थिक बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करतो. एका खेळाडूला रणजी स्पर्धेत खेळून मोसमात 10 ते 12 लाखांची कमाई करता येते. त्यासाठी बीसीसीआय रणजी स्पर्धेच्या आयोजनासाठी पुढाकार घेत आहे.
खेळाडूंना असे मिळते मानधन
रणजी ट्रॉफीतील एका लढतीसाठी खेळाडू किमान 1 लाख 40 हजार रुपये मिळतात. संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूला 70 हजार रुपये मानधनाच्या रूपात मिळतात. विजय हजारे ट्रॉफीत (वन-डे क्रिकेट) सहभागी होणाऱ्या खेळाडूला एका लढतीसाठी 35 हजार रुपये तर संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूला 17,500 रुपये मानधनाच्या रूपात मिळतात. सय्यद मुश्ताक अली (टी-20) स्पर्धेमधून खेळाडू एका लढतीमधून 17,500 रुपयांची कमाई करतो. तसेच ज्या खेळाडूला संघात स्थान मिळत नाही त्या खेळाडूला 8700 रुपये देण्यात येतात.
या फॉरमॅटमध्ये रणजी खेळवणार
बीसीसीआय रणजी स्पर्धा खेळवण्याचा विचार करीत असून त्यासाठी एक फॉरमॅटही तयार करण्यात येत आहे. यानुसार संघांची पाच गटांत विभागणी करण्यात येणार आहे. या गटामध्ये उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व व मध्य यांचा समावेश असणार आहे. सुरुवातीच्या लढती आंतर विभाग पद्धतीने खेळवण्यात येतील. त्यानंतर प्रत्येक विभागातील विजेता संघ बाद फेरीसाठी पात्र ठरेल. यानंतर स्पर्धेचा जेता ठरेल. अशा प्रकारे रणजी स्पर्धा घेण्याचा बीसीसीआय प्रयत्न करीत आहे. रणजी स्पर्धेचे आयोजन झाल्यास 38 संघांमधील जवळपास 500 खेळाडूंचा आर्थिक प्रश्न सुटेल हे निश्चित आहे.




























































