
>> सुनील कुवरे
महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत विविध क्षेत्रांतील महिलांनी बालविवाहविरोधी चळवळ उभी केली आहे. अशी चळवळ सर्वत्र उभी राहिली पाहिजे. बालविवाह हे केवळ मुलींवर अन्यायकारक नाहीत. तर सर्व समाजाला हानिकारक आहे. तेव्हा बालविवाह हा प्रश्न फक्त सामाजिक अज्ञानाचा परिपाक नाही तर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तेव्हा हे बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
महाशक्ती बनण्याचे स्वप्न बघणार्या आपल्या हिंदुस्थानात बालविवाहाला बंदी असूनही, देशाच्या अनेक राज्यात आजही बालविवाह होत आहेत. पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्र अशी ओळख असलेल्या आपल्या महाराष्ट्रातही ही कुप्रथा अधूनमधून समोर येत असते.
आपल्या देशात अनेक स्त्री सुधारक होऊन गेले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात स्त्रीला शिक्षणाचा हक्क दिला. महात्मा जोतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यामुळे आज हिंदुस्थानी स्त्री जगात भरारी घेत आहे. संविधानाने स्त्रियांना कायद्याने पुरुषांच्या बरोबरीने अधिकार दिला आहे. असे असले तरी, आजही आपल्याकडे बाल वयातच मुलींना लग्नाच्या बोहल्यावर चढविले जात आहे.अलीकडे महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात बालविवाहाच्या सात घटना घडल्या.तर काही महिन्यांपूर्वी मुंबईतसुद्धा एक घटना घडली. अठरा वर्षांशिवाय मुलींची लग्ने करू नयेत हे सर्व ज्ञात आहे, किंबहुना, अशी लग्ने ही कायद्याने गुन्हा आहे. तरीही बालविवाह होत आहेत. ही शरमेची गोष्ट आहे. बालविवाह हा एक सामाजिक प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक सामाजिक संस्था प्रयत्न करीत असतात. परंतु कायदा असूनही बालविवाहसारख्या प्रश्नाचे समूळ उच्चाटन होताना दिसत नाही.
नुकताच युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (युएनएफपीए)स्टेट वल्र्ड पॉप्युलेशन संस्थेचा 2020चा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात जगभरातील बालविवाहविषयक सद्दस्थितीची नोंद घेण्यात आली आहे. असे असले तरी, हिंदुस्थानात चारपैकी एका मुलीचा विवाह हा 18वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच केला जातो. तब्बल 21 टक्के मुलींचे विवाह हे 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लावले जातात. बिहार, प.बंगालमध्ये पाचपैकी दोन तर, झारखंड, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये तीन पैकी एका मुलीचा विवाह हा अठरा वर्षांपूर्वी लावला जातो. महाराष्ट्र, राजस्थान, झारखंड, बिहार आणि आंध्र प्रदेश या पाच राज्यांत सर्वेक्षण करण्यात आले. तरी बालविवाहाची टक्केवारी 26.8 आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे, परंतु केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीतील सॅम्पल रजिस्ट्रेशन सिस्टीमच्या 2018च्या अहवालानुसार महाराष्ट्रात बालविवाह होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बाल विवाहाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात चौदाव्या क्रमांकावर आहे. बालविवाह रोखण्यात केरळ अग्रेसर असून तेथील बालविवाहाचे प्रमाण 0.09 टक्के आहे तर प.बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे 3.7 टक्के आहे. तर बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोगाच्या अहवालानुसार राजस्थान, बिहारच्या ग्रामीण भागात बालविवाहाचे प्रमाण 89.4टक्के आहे, परंतु राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांतील मागास भागात बालविवाह सर्रासपणे होतात.
1929 बालविवाह प्रतिबंधक कायद्याने मुलीचे वय 14 वर्षे व मुलाचे वय 18 वर्षे ठरविण्यात आले होते. नंतर हा कायदा रद्द करून, सन 1978 च्या कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्षे मुलाचे वय 21 वर्षे करण्यात आले. त्यानंतर बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 हा सुधारित नवीन कायदा 1नोव्हेंबर 2007 पासून अंमलात आणला गेला. या कायद्यात शिक्षेच्या अनेक तरतुदी आहेत, परंतु, कायदा करूनही या प्रश्नाचे समूळ उच्चाटन होताना दिसत नाही असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण बालविवाहसंबंधी कायदे करून, समाजावर कायद्याचा हवा तसा प्रभाव पडलेला नाही.
देशाच्या भागात आजही काही प्रमाणात बालविवाह होतच आहेत. बालविवाह करण्यामागे अनेक कारणे आहेत. पालकांची गरिबी, शिक्षणाचा अभाव अशी अनेक कारणे आहेत, परंतु जे पालक कोवळ्या वयात आपल्या मुलीला विवाहाच्या खाईत लोटतात. त्या पालकांची मानसिकता या आधुनिक काळात तरी बदलणार आहे का? तर कधी ते आपल्या सदसदविवेक बुध्दीचा वापर करणार की नाही? हा खरा प्रश्न आहे. बालविवाह हा केवळ सामाजिक प्रश्न नाही. मुलीचे शिक्षण आणि आरोग्याशी त्यांचा थेट संबंध आहे. सर्वात घातक शिशू व माता मृत्युदर वृध्दी – शारीरिक आणि मानसिक विकास पूर्ण होत नाही. तेव्हा बालविवाहाच्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. विशेषतः ग्रामीण भागात जास्त जनजागृतीची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रथम जुन्या चालीरीती बदलणे. महिलांना त्यांना त्यांच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देणे. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन, समुपदेशन करून मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे. मुलींना प्रथमत: शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येणे गरजेचे आहे. शिक्षणामुळे निर्णय क्षमता येऊन बाल विवाहाला काही प्रमाणात आळा घातला जाऊ शकतो. बालविवाह रोखण्यासाठी संपूर्ण देशभर अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. हिंदुस्थान सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत चाईल्ड लाईन ही एक सेवा भावी अशासकीय संस्था कार्यरत आहे, परंतु त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. आता मुली सबला झाल्या आहेत, स्वबळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करीत आहेत. त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात विविध क्षेत्रांतील महिलांनी बालविवाह विरोधी चळवळ उभी केली आहे. अशी चळवळ सर्वत्र उभी राहिली पाहिजे. बालविवाह हे केवळ मुलींवर अन्यायकारक नाहीत. तर सर्व समाजाला हानिकारक आहे. तेव्हा बालविवाह हा प्रश्न फक्त सामाजिक अज्ञानाचा परिपाक नाही तर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. तेव्हा हे बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.






























































