
जगभरातील हिंदूंना ज्या क्षणाची ओढ लागली होती तो आता जवळ आला आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीचा वनवास संपला असून पाच ऑगस्टला वेदमंत्रांच्या जयघोषात प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱया या कार्यक्रमाचे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी दिली.
न्यायालयाच्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत पाच ऑगस्ट रोजी राममंदिराचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिली. राममंदिराचा शिलान्यास करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रभू रामचंद्राचे व हनुमान गढी येथे दर्शन घेतील. या कार्यक्रमासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आल्याचेही स्वामी गोविंददेव गिरी यांनी सांगितले.
रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या मुळ आराखडय़ात काही बदल सुचवले आहेत. ट्रस्टने मंदिराचे नाव श्रीराम जन्मभूमी मंदिर असे ठेवले आहे. मंदिराचा आकार वाढवून 84600 चौरसफूट करण्यात आला आहे. अगोदर मंदिराची क्षमता 20 हजार भाविकांची होती, ती आता 50 हजारांपेक्षा जास्त झाली आहे.




























































