
सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेली कोरोना प्रतिबंधक लस येत्या ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल अशी माहिती इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली. या लसीच्या निर्मितीसाठी सिरम इन्स्टिट्यूटने ‘अॅस्त्राझेनेका’ या बायोफार्मा कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना पुनावाला यांनी ही माहिती दिली. सिरमने बनवलेल्या लसीच्या चाचणीचा पुढचा टप्पा ऑगस्टच्या मध्यावधीत सुरू होईल असे पुनावाला यांनी सांगितले. सिरम इन्स्टिट्यूट यासंदर्भात ओडिशा सरकारच्या संपर्कात आहे. या लसीच्या निर्मितीसाठी कंपनी ऑक्सफर्ड विद्यापीठाचीही मदत घेत असल्याबद्दल पटनायक यांनी आनंद व्यक्त केला.



























































