
शेती व्यवसाय करणाऱ्या विठ्ठल कदम यांना श्वसनाचा त्रास सतावत होता. त्यांचा रक्तदाब कमी झाला होता, लघवी होत नव्हती, पूर्ण शरीराला सूज होती आणि गंभीर हृदयविकाराचा झटका आल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आले. 20 जून रोजी संध्याकाळी सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
विठ्ठल यांच्यावर रि-डू व्हॉल्व रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया करण्यात फार मोठी जोखीम होती. कारण त्यांची स्थिती फारच नाजूक झाली होती, त्याचप्रमाणे पूर्वी ओपन हार्ट सर्जरी देखील करण्यात आली होती. ट्रान्सकॅथेटर एओर्टीक व्हॉल्व रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) हा एक चांगला पर्याय असल्याचे एचएनआरएफच्या मेडीकल टीमने सुचवले. ही पहिल्या स्वरुपाची इमर्जन्सी ट्रान्सकॅथेटर एऑर्टीक व्हॉल्व रिप्लेसमेंट (टीएव्हीआर) प्रक्रिया असून सर एचएन रिलायन्स फाउंडेशन येथे 62 वर्षीय शेतकऱ्यावर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. या शेतकऱ्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
विशेष प्रकारचा टीएव्हीआर ही एक व्हॉल्व-इन-व्हॉल्व प्रोसिजर असून रुग्णाचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्याकडून प्रक्रियेला परवानगी मिळाल्यावर केवळ चारच तासांत पूर्ण करण्यात आली. हा एक विक्रम मानला जातो.
रुग्णाचा जुना व्हॉल्व फेल झाल्याने सुमारे तासभर चाललेल्या प्रक्रियेत रक्तवाहिन्यांच्या सांध्यातून कार्डीओलॉजिस्टनी नवीन व्हॉल्व बसवला. त्याकरिता पूर्ण छाती उघडण्याची गरज लागली नाही. रुग्णाची मंदावलेली हृदयक्रिया सुधारली. या संपूर्ण प्रक्रियेनंतर काही क्षणातच शारीरिक हालचाली पूर्ववत होऊन प्रकृती स्थिर झाली.
विठ्ठल कदम यांना 4 जुलै रोजी हॉस्पिटलमधून सोडण्यात आले.
विठ्ठल कदम यांच्या पुतण्याने सांगितले की, सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये आपल्या काकांचा पुनर्जन्मच झाला. पेशाने स्वत: डॉक्टर असणारे संजय कदम म्हणाले, “माझे काका अगदी सामान्य आयुष्य जगत आहेत. आज ते हयात आहेत आणि आमच्या सोबत आहेत याचे संपूर्ण श्रेय हे सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे आहे. माझ्या काकांचे प्राण वाचवणे ही अशक्यप्राय गोष्ट होती याची जाणीव मला डॉक्टर या नात्याने होतीच. ओपन हार्ट व्हॉल्व रिप्लेसमेंट करण्याचा त्यांचा विचार होता. परंतु टीमने टीएव्हीआर करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्याला संमती दर्शवली. माझ्या काकांचा जीव वाचविल्याबद्दल माझे सर्व कुटुंबीय डॉक्टरांचे आणि सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल टीमचे ऋणी आहेत.”
यामध्ये डॉ. मौलिक पारेख (टीएव्हीआर तज्ज्ञ, प्रॉक्टर), डॉ. अन्वय मुळये (सर्जन), डॉ. मनोज मश्रू (कार्डीऑलॉजीस्ट), डॉ. अजित मेनन (कार्डीऑलॉजीस्ट), डॉ. प्रवीण कुलकर्णी, डॉ. ताल्हा मिरान, डॉ. निरंजन, डॉ. हिमांशु, डॉ. भावेश व्होरा, अशी डॉक्टरांची टीम कार्यरत होती.






























































