
गडहिंग्लज येथील कोविड आरोग्य केंद्रात पॅन्ट व बनियनद्वारे बाथरुममध्ये गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार आज दुपारी समोर आला आहे. विशेष म्हणजे कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊन सुद्धा या तरुणाने नैराश्येतुन टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. सुधीर दत्तात्रय येसरे (वय – 35, रा. लिंगनूर, कसबा नूल ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार 22 जुलै रोजी ताप व थकवा आल्याने सुधीर मोठा भाऊ यशवंतसह शेंद्री माळावरील कोविड केंद्रात स्वतःहून तपासणीसाठी आला होता. गुरूवारी दोघांचेही स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्यांना कोविड केंद्राच्या जवळच एका खासगी दवाखान्यात ठेवण्यात आले होते. आज या दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. पण दुपारी जेवणानंतर सुधीरने बाथरूममध्ये जाऊन आत्महत्या केली.
सुधीर अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार दिनेश पारगे आदींनी भेट देऊन माहिती घेतली.


























































