पदवी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया धिम्या गतीने विद्यार्थी हैराण; अर्ज भरण्यास एक दिवस पुरेना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. पसंतीक्रम नोंदविण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉलेज कोडच उपलब्ध होत नसल्याने ऑनलाईन अर्ज भरण्यास एक दिवसही पुरत नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रवेशाची वेबसाईट धिम्या गतीने सुरू असल्याने विद्यार्थी आणि पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थी विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाऊन नोंदणी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे अर्ज भरताना विद्यार्थांना अनेक अडचणींना सामोरे जाके लागत आहे.

विद्यार्थ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा
– वेबसाइटवर माहिती सेव्ह होत नसल्याने पुन्हा तीच माहिती भरावी लागते. यामध्ये खूप वेळ वाया जातो.
– कॉलेजची माहिती आणि कोड नंबर उपलब्ध करून न दिल्याने गूगलमध्ये जाऊन माहिती शोधावी लागत आहे.
– कोणती अनुदानित महाविद्यालये आणि कोणती विनाअनुदानित याची माहिती नसल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत.

नेटवर्कमुळे अडचणी
एकाच वेळी अनेक विद्यार्थी अर्ज भरत असल्याने अडचणी येत असतील. असे मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी विद्यापीठाने घेतली आहे. विद्यार्थांकडील नेटवर्क आणि इतर कारणांमुळेही अर्ज भरण्यात अडचणी येत असाव्यात. महाविद्यालयांची माहितीही वेबसाइटवर उपलब्ध आहे, असे विद्यापीठाच्यावतीने सांगण्यात आले.