
धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर दादर आणि माहीममधील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेने दादर पश्चिमेकडील कोहिनूर सार्वजनिक वाहनतळ येथे सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी वॉर्डमधील वॉररूमध्ये नावनोंदणी बंधनकारक असून तपासणीवेळी आधारकार्ड सक्तीचे केले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या धारावीत कमी झाली असून दादर आणि माहीम परिसरात काही प्रमाणात वाढली आहे. त्यावर नियंत्रणासाठी आता दादर आणि माहीममधील रहिवाशांसाठी पालिकेने कोरोना चाचणी सुविधा सुरू केली आहे. तपासणीआधी जी/उत्तर विभागातील वॉररुमला संपर्क करून 022-24210441 या नंबरवर नाव नोंदवणे बंधनकारक आहे. नावनोंदणी नसेल तर चाचणी केली जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत 9 जणांनी केले प्लाझ्मा दान
धारावीत पालिकेने सुरू केलेल्या प्लाझ्मा दान मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन दिवसांत 160 जणांची रक्तचाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 40 जण प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र ठरले आहेत तर आतापर्यंत 9 कोरोनामुक्त व्यक्तींनी प्लाझ्मा दान केले आहे. दरम्यान, धारावीतील कोरोनामुक्त झालेल्या सुमारे 500 जणांनी प्लाझा दान मोहिमेसाठी होकार दिला आहे.





























































