
बालिकेची छेड काढल्याच्या रागातून चार जणांनी परप्रांतीय कामगाराचा खून केल्याचा प्रकार कवलापूर तालुका मिरज येथे घडला. याप्रकरणी चार जणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी अटक केली आहे.
जेसीबी ऑपरेटर असणारा मूळचा बिहारचा पण सध्या कवलापूर येथे राहत असलेल्या कुंदन कुमार भोला याने शेजारी राहत असलेल्या बालिकेशी अश्लील वर्तन केल्याचा कारणावरून जबर मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाला
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मुळचा बिहार राज्यातील जाफरगंज तालुका सिरनिया जिल्हा कटिहर परंतु हा सध्या सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील कवलापूर या गावी राहत होता. तो अरुण नलावडे यांच्याकडे जेसीबी ऑपरेटर म्हणून गेल्या दीड वर्षापासून काम करत होता. तो रहात असलेल्या परिसरातील एका अल्पवयीन मुलीशी त्याने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या मुलीच्या नातेवाईकांनी चिडून या जेसीबी ऑपरेटरला जोरदार मारहाण केली. चाकूचे वारही केल्याने या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता.
जखमी अवस्थेत त्याला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो मयत झाल्याचं जाहीर केलं. त्यामुळे या ऑपरेटरच्या मृत्यूशी कारणीभूत असलेल्या चौघांचा छडा लावून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. शब्बीर असलम शेख (30) अनिकेत सुरेश पाटील(23)गणेश शहाजी पाटील (29) हे तिघे रा.बुधगांव आणि विकास माने (28) रा. बिसूर या चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.


























































