ठसा – डॉ. प्रागजी वाजा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकृष्ण हरचांदे

रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे मुंबईच्या विविध विभागांबरोबरच लालबाग, चिंचपोकळी, काळाचौकी परिसरातील वैधकीय क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्वाचे डॉ. प्रागजी सावजी वाजा यांनी वयाची 61 वर्षे पूर्ण केली. रुग्ण व मानवसेवा हीच ईश्वरसेवा अंगी जोपासणारे डॉ. प्रागजी वाजा हे हसतमुख व आदर्श व्यक्तिमत्त्व आरोग्य व वैधकीय क्षेत्रात आपल्या कार्याने नावाजलेले आहे.

कोरोना या आजारात देशात लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक ठिकाणी कोरोना या आजाराव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचारासाठी खासगी डॉक्टर्स दवाखान्यात उपलब्ध होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प होऊ लागल्याने नागरिकांची गैरसोय होत असताना काळाचौकी या विभागात आपला दवाखाना सकाळ-संध्याकाळ सतत सुरू ठेवून व प्रसंगी घरी व्हिजिट करून जनतेला वैधकीय सेवा देण्याचे मोलाचे व धाडसाचे काम केल्याबद्धल त्यांचे सर्वच क्षेत्रातून विशेष कौतुक होत आहे. कोरोना या सुरू असलेल्या आजारात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच इतर सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या व सुरू असलेल्या विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिरात त्याचा मोलाचा वाटा आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन मुंबईचे ते माजी सरचिटणीस असून आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱया माता यशोदा आरोग्य अंकाचे ते प्रमुख आरोग्य सल्लागार तसेच मुंबईतील नावाजलेल्या तरुण मित्र मंडळाचे पदाधिकारी असून संपूर्ण वर्षभर विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, नेत्रदान व अवयवदान शिबीर आदी उपक्रम संपूर्ण मुंबईत त्याच्या पुढाकाराने सुरू आहेत.

आरोग्य सेवेसाठी कधीही व कोणत्याही वेळेसाठी धावून जाणे हा त्यांचा गुणधर्म असून तळागाळातील लोकांची व रुग्णांची सेवा करणे हा त्यांचा महत्त्वाचा गुण आहे. आवश्यक असलेल्या अनेक गरजूंना त्यांनी विनामूल्य आरोग्य सेवा उपलब्ध करून दिलेली आहे व देत आहेत. रुग्णाना रुग्णालयात दाखल करून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा देण्याचे मोलाचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. मुंबईतील नावाजलेल्या तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य शिबिराबरोबरच प्रत्येक 3 महिन्यांनी आयोजित होत असलेल्या विक्रमी रक्तदान शिबिरासाठी त्याचे मोलाचे सहकार्य असते. त्यांच्या पुढाकाराने मुंबईत व महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागात आतापर्यंत 300 हून अधिक विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन झालेले आहे. मुंबईतील विविध सामाजिक, क्रीडा व समाजप्रबोधन करणाऱया संस्थांशी त्यांचा संबंध असून या संस्थांच्या माध्यमातून त्यांची समाजसेवा सुरू आहे.

प्रयत्न, जिद्द , चिकाटी व प्रामाणिकपणा हे त्यांचे गुण असून त्यांच्या या कार्याबद्धल त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत.