
कर्नाटकातील अभ्यासक्रमातून म्हैसूरचा वादग्रस्त राज्यकर्ता टिपू सुलतान व त्याचा पिता हैदर अली या दोघांचा इतिहास ‘गुल’ झाला आहे. राज्य सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 30 टक्के अभ्यासक्रम कमी करताना सातवीच्या पुस्तकातील टिपू आणि हैदर अलीचे धडे वगळले आहेत. भाजपच्या येदियुरप्पा सरकारने राज्यात सत्तेवर येताच शाळांच्या पुस्तकातील टिपूचा इतिहास पुसण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे अभ्यासक्रमातील बदलावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
कर्नाटक बुक सोसायटीच्या वेबसाईटवर सोमवारी नवीन अभ्यासक्रम अपलोड करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शैक्षणिक वर्षातील 220 दिवसांचा अभ्यासक्रम कमी करून तो 120 दिवसांचा करण्यात आला आहे. हा बदल केवळ यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी लागू राहणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. सहावी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात पुन्हा पुन्हा आलेला अभ्यासक्रमही वगळण्यात आला आहे. याआधी केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नववी आणि बारावीच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. दरम्यान, अभ्यासक्रमातील हा बदल तज्ज्ञ मंडळींनी केला आहे. तज्ज्ञांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही. किंबहुना, त्यांच्या कामावर कोणतीही टिप्पणी किंवा सूचना करू शकत नाही, असे स्पष्टीकरण कर्नाटक टेक्स बुक सोसायटीचे संचालक मेड ग्वाडा यांनी दिले.





























































