आरपीएफच्या कोरोना वॉरियर्सकडून प्लाझ्माचे दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलातील कोरोना कॉरियर्स जवानांनी प्लाझ्मा दान करून कोरोना साथीच्या विरुद्ध लढय़ाला आणखी बळ दिले आहे. आरपीएफचे जवान सुरुवातीपासून प्रकाशांच्या सुरक्षेसाठी फ्रंटवर डय़ुटी करीत आपले कर्तव्य बजावत आहेत.

रेल्वेने लॉकडाऊनमुळे अडवलेल्या मजूरांच्यासाठी 1 मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सोडल्या, त्याआधी मालगाडी आणि पार्सल सेवा सुरूच ठेवल्याने स्थानक परिसराची आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षा राखण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच अडकलेल्या मजूरांच्यासाठी अन्न पाकिटे आणि पाणी मोफत वाटण्याचे काम सुरूच होते, त्यामुळे त्यांनाही कोरोनाचा सामना करावा लागला. या आजारांवर मात करून कोरोना कॉरियर्सनी रक्तातील घटक प्लाझ्मा दान करून नवा आदर्श निर्माण केला आहे. यात माटुंगा डॉग स्क्वॉडचे हेडकॉन्स्टेबल संतोष काळे, सीएस एमटीचे कॉन्स्टेबल अमित कुमार, टिळक टर्मिनसचे कॉन्स्टेबल नीलेश सोमवंशी आणि कुर्ला येथील मनवीर कुमार यांनी जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा दान केले आहे.

सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये स्ट्राईक फोर्सचे हवालदार राकेश कुमार आणि सुमित कुमार यांनी प्लाझ्मा दान केला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी आरपीएफ जवानांनी दाखवून दिलेल्या सामाजिक जबाबदारीचे कौतुक केले आहे.