अयोध्येत बुद्धमंदीर बांधण्याची रामदास आठवलेंची मागणी, योगी आदित्यनाथांची भेट घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अयोध्येत बुद्धमंदीर उभारावे अशी मागणी केली आहे. आपण या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. अयोध्येत बुद्ध मंदीर उभे राहावे ही मागणी आपण गेल्या 7-8 वर्षांपासून करत असल्याचं आठवले यांनी म्हटलं आहे. आठवले म्हणाले की ‘राम मंदिराच्या आधी तिथे बुद्धमंदीर होतं. अडीज हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकानंतर आपला देश बुद्धीस्ट होता. त्यामुळे आपल्या देशातील मंदीरे ही सगळी बुद्ध मंदीरे होती.’

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पुन्हा एकदा अयोध्येत बुद्ध मंदीर उभारावे अशी मागणी केली आहे. आठवले यांनी म्हटले की अयोध्येतील जागा राम मंदिरासाठी देण्याचा निर्णय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदर करतो. मात्र अयोध्येत बुद्ध मंदीर असावं असा आमचा आधीपासूनचा आग्रह होता. आठवले पुढे बोलताना म्हणाले की ‘सरकारने जागा दिली तर ठीक आहे. नाही मिळाली तर एखादा ट्रस्ट उभा करून अयोध्येत एखादं बुद्ध मंदीर उभं राहावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’ राम मंदिराचे भूमीपूजन झाल्यानंतर आपण योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले. भूमीपूजनाच्या कार्यक्रमानंतर अयोध्येत एखादी जागा घेऊन तिथे बुद्धविहार बांधण्याचा माझा प्रयत्न असेल असे आठवले म्हणाले.