
यंदाची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत होणार हे जवळपास निश्चित झाले असतानाच या स्पर्धेच्या फायनलच्या तारखेवरून स्टार इंडिया व बीसीसीआय आमने सामने आले आहेत. आयपीएल गव्हार्ंनग समितीची बैठक आगामी दिवसांमध्ये होणार असून यामध्ये याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल. आयपीएलच्या लढतींचे प्रक्षेपण स्टार वाहिनीद्वारा करण्यात येते. त्यांना आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरऐवजी 10 नोव्हेंबरला करावयाचे आहे. कारण या आठवडयात दिवाळी हा सण हिंदुस्थानात साजरा होणार आहे. यामुळे त्यांना मोठया प्रमाणात जाहीराती उपलब्ध होतील. पण यामुळे स्पर्धा आणखी दोन दिवस वाढेल. अन् याचा फरक हिंदुस्थानच्या ऑस्ट्रेलियन दौर्यावर पडेल. यामुळे बीसीसीआयचा याला विरोध आहे. आता प्रत्यक्षात कोणता निर्णय घेण्यात येतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
युएईतच खेळाडूंचे सराव शिबीर
युएईत आयपीएलचा धमाका होणार आहे. आठ नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर काही दिवसांसाठी हिंदुस्थानी खेळाडूंना मायदेशात कुटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे. पण आता अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळवण्यात आल्यास खेळाडूंना युएईमधून थेट ऑस्ट्रेलियाला जावे लागणार आहे. तसेच ज्या खेळाडूंचा संघ साखळी फेरीतच बाद झालेला असेल त्यांनाही युएईतच सराव शिबीरामध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना आटोपल्यानंतर सर्व खेळाडू एकत्रितपणे ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.





























































