
चोरी करण्याच्या उद्देशाने पूर्वी काम करणाऱ्या वॉचमनने पुण्यातल्या प्रभात रस्त्यावरील ग्रीनपार्क निवास्थानातील एका ज्येष्ठ महिलेवर चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
सोमनाथ बंडू बनसोडे (वय 48, रा.भुगाव)असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगिता प्रभाकर मोडक (वय 70) यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता प्रभात रस्त्यावरील ग्रीनपार्क निवास्थानात पतीसोबत राहतात. त्यांचा ऑटो मोबाईल पार्ट विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत तर मुलगी पिंपळे-सौदागरला राहते. पाच वर्षापुर्वी योगिता यांचा मुलगा अमेरिकेला गेल्यावर सोमनाथ बनसोडेने त्यांच्या घरी चोरी करुन 7 ते 8 लाखांचे दागिने चोरले होते. मात्र, 20 वर्षांपासून बनसोडे तेथे कामाला असल्याने त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही.
गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास योगिता यांनी बाल्कनीचा दरवाजा उघडला. त्यावेळी अचानक सोमनाथ बाल्कनीतून घरात शिरला. त्याने योगिता यांच्या गळ्याला चाकू लावला. झटापटीत चाकुचे पाते मोडक यांच्या अंगठ्याला लागले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी सोमनाथला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एम. सूर्यवंशी अधिक तपास करत आहेत.






























































