मालाडची ‘कोरोनामुक्ती’कडे वाटचाल!  दररोजची रुग्णसंख्या आली निम्म्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रुग्णसंख्येमुळे एकवेळ मुंबईतील दुसर्‍या क्रमांकांचा ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पालिकेच्या पी-उत्तर म्हणजेच मालाड प्रभागाने आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. या विभागात गेल्या 15 दिवसांत सील इमारतींची संख्या तब्बल पंधराशेंनी कमी झाली आहे. तर 7 कंटेनमेंट झोनही प्रतिबंधमुक्त झाले आहेत. आतापर्यंत विभागात आढळलेल्या 6484 रुग्णांपैकी 5 हजार 200 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून आता केवळ 824 ऍक्टिव्ह केसेस असल्याची माहिती सहायक आयुक्त संजोग कबरे यांनी दिली.

पालिकेच्या पी-उत्तर विभागात मालाड पूर्वमध्ये दिंडोशी, कुरार, पठाणवाडी, आप्पापाडासह पश्चिम विभागात मढ, मार्के, मालवणी, लिंक रोड, जनकल्याण नगर अशा परिसरांचा समावेश होतो. या सर्वच विभागांत दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्या असल्यामुळे क्लोज काँटॅक्टमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढली. मात्र पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार सुरू झालेल्या ‘मिशन झिरो’ मोहिमेअंतर्गत ‘चेस द व्हायरस’, मोबाईल व्हॅन क्लिनिक, घरोघरी तपासणी, हेल्मेट स्क्रिनिंग, प्रभावी क्कारेंटाइन-निर्जंतुकीकरण अशा उपाययोजना वेगाने केल्यामुळे मालाडमध्ये आता कोरोना रुग्णसंख्या चांगलीच नियंत्रणात येत आहे. 13 जुलैपर्यंत या विभागात दररोज 100 कोरोनाबाधित आढळत होते. मात्र ही संख्या 50 ते 55 पर्यंत खाली आली आहे. 30 जुलैपर्यंत मुंबईची रुग्णवाढ 0.93 टक्के आणि डबलिंग रेट 75 दिवस असताना मालाड विभागाची सरासरी रुग्णवाढ 0.9 टक्क्यांवंर आली असून डबलिंग रेटही 77 दिवस झाला आहे. दरम्यान, पी-उत्तरमध्ये आतापर्यंत 337 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कॉर रूमचा फायदा

मालाड प्रभागात सुरू झालेल्या वॉर रूममुळे रुग्णांना ट्रेसिंग करणे सोपे झाले आहे. त्यामुळे रुग्ण ट्रेसिंग होत नसल्याचे प्रकार बंद होत आहेत. जास्त रुग्ण आढळल्यास संपूर्ण सोसायटी सील करण्यात येत असल्याचाही फायदा होत आहे. सध्या या विभागात 35 कंटेनमेंट झोन असून 1500 इमारती-इमारतींचे भाग सील आहेत.

फेरीवाले, दुकानदारांचीही अँटिजन टेस्ट

कोरोनाला आळा घालण्यासाठी सोसायट्या, झोपडपट्ट्यांसह फेरीवाले, दुकानदारांची अँटिजन टेस्ट करण्यात येत आहे. साईनाथ मंडई, धनकवाडी या ठिकाणी केलेल्या 200 टेस्टमध्ये 4 पॉझिटिव्ह रुग्णही आढळले आहेत. जून-जुलैमध्ये विभागात 140 आरोग्य कॅम्प, 20 हजार लोकांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. सुमारे 2400 अँटिजन टेस्टमध्ये 145 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या कामात पालिकेला बीजीएस संस्थांचेही सहकार्य मिळत आहे.