
देवेंद्र भगत | मुंबई
कोरोनामुळे फक्त 400 कामगारांच्या माध्यमातून सुरू असणारे कोस्टल रोडचे काम सर्व एक हजार कामगार-कर्मचारी परतल्यामुळे आता आणखी वेगाने सुरू झाले आहे. शिवाय रात्री 11 ते सकाळी 5 याच वेळेतच सुरू असणारी डंपर-ट्रकची वाहतूकही सध्या दिवसरात्र सुरू असल्याने कामाला चांगलाच वेग आला आहे. महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता विजय निघोट यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील मुंबईला वेगवान बनवणार्या प्रिंन्सेस स्ट्रिट ते वरळी सी-लिंकपर्यंतच्या 9.98 किमीच्या कोस्टल रोडचे काम कोरोनाचा प्रभाव असतानाही आवश्यक ती सर्व प्रकारची खबरदारी घेऊन सुरू आहे. मात्र कडक लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अनेक कामगार कामावर येऊ शकत नव्हते. शिवाय गर्दी टाळणेही प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. या पार्श्वभूमीवर उपलब्ध 400 कामगार आणि साधनसामग्रीच्या सहाय्याने काम सुरू होते. दरम्यान, 9.98 किमीच्या मार्गात असणार्या एकूण 3.45 किमीचा बोगदा खोदण्यासाठी लागणारी महाकाय टनेल मशीन बसवण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून कामाचा वेग आणखीनच वाढणार आहे.
1500 डंपर-ट्रकची वाहतूक
‘कोस्टल रोड’च्या कामासाठी डंपर-ट्रक आणि इतर वाहनांची वाहतूक फक्त रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंतच करण्याची परवानगी ट्राफिक विभागाकडून देण्यात आली होती. मात्र लॉकडाऊनमुळे इतर वाहतुकीचा प्रश्न नसल्याने दिवसरात्र वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शिवाय 700 ट्रक-डंपरची संख्याही आता 1500 वर पोहोचली असून बांधकामासाठी लागणारे सिमेंट, खडी, लोखंडी साहित्य, समुद्री भिंत बांधण्यासाठी लागणारे मोठे दगड आदींची वाहतूक वेगाने सुरू आहे.
9.98 किमी टोल फ्री रस्ता
कोस्टल रोडमुळे प्रिंन्सेस स्ट्रीट या मुंबईच्या दक्षिण टोकापासून थेट वांद्रय़ापर्यंतचा 9.98 किमीचा प्रवास मुंबईकरांना टोल-प्री रस्त्यावरून सुस्साट करता येणार आहे. यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याने मुंबईच्या विकासालाही चालना मिळणार आहे. कोस्टल रोडमुळे वेळेची बचत 70 टक्के होईल, तर प्रतिवर्षी इंधनाची बचत 34 टक्के होईल. शिवाय ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.




























































