
मुंबईची पाण्याची काढती गरज भागवण्यासाठी पालिकेकडून गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा असे तीन नवे जल प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या नव्या धरणांसाठी पालिकेच्या माध्यमातून सध्या वेगाने कार्यवाही सुरू आहे. यामध्ये गारगाई 440, दमणगंगा 1586 आणि पिंजाळमधून 865 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईला दररोज होणार्या 3800 दशलक्ष लिटरच्या पाणीपुरवठ्यात 2891 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडणार आहे.
मुंबईला मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. मात्र तलाव क्षेत्रात कमी पाणीसाठा असल्यास वर्षभराचे नियोजन करण्यासाठी पालिकेला मुंबईत 10 ते 20 टक्क्यांची पाणीकपात करावी लागते. यामध्ये नोव्हेंबर 2018 पासून जुलै 2019 पर्यंत 10 टक्के पाणी कपात करावी लागली होती. तर यावर्षीदेखील सातही तलावात आतापर्यंत केवळ 35 टक्केच पाणी जमा झाल्याने 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, चंद्रपूरमध्ये पर्यायी जंगल
गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुव्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्यात येणार आहे. या जल प्रकल्पासाठी पालिकेची सध्या केगात कार्यकाही सुरू आहे. पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होईल.
या ठिकाणच्या सहा गावांमधील एकूण 618 कुटुंबांना पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहमतीही दर्शवली असून ग्रामसभेत तसे ठरावही संमत करण्यात आले आहेत. शेतकर्यांनाही पर्यायी शेतजमीन देण्यासाठी वन विभागासोबत समन्वयाने काम सुरू आहे.
विशेष म्हणजे गारगाई तलावामुळे वनक्षेत्राला फटका बसत असला तरी पर्यायी जंगल चंद्रपूरच्या ताडोबा वनक्षेत्राजवळ विकसित करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी वेलरासू यांनी दिली. यासाठी जागा निश्चित करण्यात येईल.
गारगाई प्रकल्पासाठी सध्या भूसंपादन, पुनर्वसन नियोजनाचे वेगात सुरू आहे. यासाठी साडेचार हजार कोटी खर्च येणार आहे. तर पिंजाळ, दमणगंगा जल प्रकल्पात 4500 लोकांचे पुनर्वसन करावे लागणार. तिन्ही प्रकल्पांना एकूण सुमारे साडेचौदा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे.- पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)




























































