संभाजीनगर – अग्निशमन विभागातही कोरोनाचा शिरकाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेपाठोपाठ आता अग्निशमन विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. चिकलठाणा केंद्रातील एका कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर एक दिवसासाठी हे केंद्र बंद ठेवण्यात आले होते. या काळात तेथील उर्वरित कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्या सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात चार महिन्यांपासून कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचे बहुतेक सर्वच कर्मचारी कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये कामाला गुंतलेले आहेत. त्यासोबतच अग्निशमनचे कर्मचारीही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या भागात जाऊन औषध फवारणीचे काम करत आहेत. आतापर्यंत मनपाच्या जवळपास तीस ते पस्तीस अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, आतापर्यंत अग्निशमन विभागात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतु आता चिकलठाणा अग्निशमन उपकेंद्रातील एका कर्मचाऱ्यालाही कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह येताच तातडीने तेथील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करुन दुसऱ्या दिवशी सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. परंतु तोपर्यंत एक दिवस या उपकेंद्राचे काम बंद ठेवले असे मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे यांनी सांगितले.