
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत वेताळबांबर्डे नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला लागून असलेला मातीचा भराव नदीत कोसळला. त्यामुळे तेथे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या पुलावरील नवीन रस्त्यावर आडवी भेग पडली आहे. अलीकडेच एका बाजूचा हा नवीन महामार्गावरील वाहतुकीस खुला करण्यात आला होता. मात्र पूलाच्या बांधकामाला लागूनच असलेला मातीचा भराव खचल्याने या पूलावरून होणारी वाहतूक बंद करून पुन्हा जुन्या पुलावरून वळविण्यात आली आहे.
वेताळबांबर्डे तेलीवाडी येथील चौपदरीकरणांतर्गत नवीन डांबरीकरण रस्त्याचा काही भाग उखडला असतानाच आता वेताळबांबर्डे हातेरी नदीवरील नवीन पुलासाठी टाकण्यात आलेला मातीचा भराव पुलाच्या बांधकामाजवळच नदीत कोसळला. वेताळबांबर्डे जून्या पुलाच्या अलिकडे नदीवर चौपदरीकरणांतर्गत पूल बांधण्यात आले आहे. या पूलाच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. यातील एका बाजूचा पूल पूर्ण झाल्याने या रस्त्याने आठवडाभरापूर्वीच कणकवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू करण्यात आली होती. या पुलाच्या बांधकामाला लागूनच असलेला मातीचा भराव पावसाने खचून तो नदी पात्रात कोसळला. तेथे भराव वाहून जाऊ नये यादृष्टीने कोणतीही दक्षता घेण्यात आलेली नसतानाच वाहतूक सुरू करण्यात आली होती. दोन्ही पुलांजवळ अर्धवट कामे पूर्ण केली जात आहेत. ही कामे सुरू असतानाच हा भराव कोसळला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर खड्डे पडले आहेत. चौपदरीकरणांतर्गत होत असलेल्या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ठेकेदार कंपनी प्रशासनाकडून अगदी रामभरोसे काम सुरू आहे. या पुलाजवळ एखादी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण होते? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.




























































