फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली… श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या क्षणाची प्रतीक्षा कोट्यवधी जनता करत होती तो आनंदाचा, उत्साहाचा, समाधानाचा क्षण आता आला आहे. अनेक पिढय़ांचा संघर्ष, त्याग, बलिदानानंतर पुण्यभूमी अयोध्यानगरीत उद्या बुधवारी प्रभू श्रीराम मंदिराचा भूमिपूजनाचा सोहळा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्य़ा या सोहळ्याला मोजकेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोरोना संसर्गामुळे अयोध्येत जाऊन जनतेला प्रत्यक्ष या सोहळ्यात सहभागी होता येणार नसले तरी, वृत्तवाहिन्यांवर हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवता येणार आहे. ‘फुले प्रीतीच्या आनंदाच्या अश्रूंनी भिजली… श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली’ असेच सर्वत्र वातावरण आहे.

भूमिपूजन सोहळ्यासाठी केवळ 175 मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. त्यात विविध अध्यात्मिक परंपरा असलेले 135 संत-महंत यांना निमंत्रित केले आहे. भूमिपूजन सोहळ्यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.  श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली आहे. अयोध्येतील घरांच्या भिंती भगव्या, पिवळ्या रंगांनी रंगवल्या आहेत. सर्वत्र मंगलमय वातावरण आहे. अयोध्येतील विविध मठांमध्ये पूजा-अर्चा, होम-हवन, भजन, कीर्तन सुरू आहे. पवित्र शरयू नदीचा घाट विद्युत रोषनाईने उजळून निघाला असून, अयोध्येत ठिकठिकाणी प्रभु श्रीराम, हनुमानाचे भव्य कटआऊट्स लावण्यात आले आहे.

कोरोनामुळे कोट्यवधी जनतेला प्रत्यक्ष अयोध्येत जाता येणार नसले तरी, देशभरात आनंदाचे वातावरण आहे. अयोध्या नगरीचे रंगरूप पालटले असून, प्रचंड उत्साहाचे, आनंदाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी भव्य रांगोळ्या, दीपोत्सवाने जणू दिवाळीच साजरी होत आहे.

पंतप्रधान मोदी तीन तास अयोध्येत

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  सकाळी 10.35 वाजता लखनौ विमानतळावर आगमन होईल. 10.40 वाजता हेलिकॉप्टरने ते अयोध्येकडे प्रस्थान करतील.
  • सकाळी 10.40 ला अयोध्येत पोहचल्यानंतर सर्वात प्रथम हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतील आणि पूजा करतील. कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी रामभक्त हनुमान यांचे प्रथम दर्शन घेण्याची अयोध्येत प्रथा-परंपरा आहे.
  • दुपारी 12 वाजता पंतप्रधान मोदी श्रीराम जन्मभूमी परिसरात पोहचतील. तेथे परिसरात पारिजात वृक्षाचे रोपण करतील. पारिजात वृक्षाचे हिंदू धर्म शास्त्रात महत्त्व आहे.
  • दुपारी 12.30 वाजता शुभमुहर्तावर भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होईल. वेद मंत्रोच्चारात श्रीराम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम होईल.
  • अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर तीन ते साडेतीन वर्षांत पूर्ण होईल. प्रसिद्ध वास्तूकार निखिल सोमपुरी यांनी नवा आराखडा तयार केला आहे.