
मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य रुग्णालये आणि सार्वजनिक खात्याअंतर्गत येणाऱ्य़ा कर्मचाऱ्य़ांना हजेरीसाठी आता बायोमेट्रिकबरोबर मस्टरचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे पालिका रुग्णालये आणि आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्य़ांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी विशेष सहकार्य केले. त्यामुळे कामगार संघटनांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला बायोमेट्रिक हजेरी बंद करून पालिका कर्मचाऱ्य़ांना मस्टरवर हजेरी लावायला पालिका प्रशासनाने परवानगी दिली. मात्र, यातून पालिका रुग्णालये आणि आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्य़ांना वगळण्यात आले होते. याला पालिकेतील कामगार संघटनांनी विरोध केला होता. याबाबत संघटनांनी पालिका आयुक्त, महापौर यांच्याकडे याबाबत सतत पाठपुरावा केला. त्या पार्श्वभूमीवर आज पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी परिपत्रक काढले. यात पालिका रुग्णालये, आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्य़ांना मस्टर हजेरीचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.























































